मुंबई : प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते समीर खक्कर यांचं निधन झालं. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 80 च्या दशकात दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी ‘खोपडी’ ही दारूड्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. समीर यांचे बंधू गणेश खक्कर यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. यावेळी त्यांनी निधनाचं कारणसुद्धा सांगितलं. समीर यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे मंगळवारी त्यांना बोरिवलीच्या एम. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आलं होतं. मात्र मल्टीपल ऑर्गन फेलिअरमुळे आज (बुधवार) पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं. समीर यांच्या पार्थिवावर बोरिवलीच्या बाभई नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
समीर खक्कर हे बोरिवलीच्या आईसी कॉलनीमध्ये एकटेच राहायचे. त्यांची पत्नी अमेरिकेत वास्तव्यास असते. अंत्यसंस्कारासाठी समीर यांचं पार्थिव सकाळी 11 वाजताच्या सुमारास स्मशानभूमीत नेण्यात येणार आहे. ते अखेरचे ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘फर्जी’ या वेब सीरिजमध्ये झळकले होते.
समीर यांनी मनोरंजन, सर्कस (शाहरुख खानसोबत) यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. याशिवाय परिंदा, इना मिना डिका, दिलवाले, राजा बाबू, आतंक ही आतंक, शहनशाह, अव्वल नंबर, हम है कमाल के यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.