बाजीप्रभू देशपांडे यांचं मूळ नाव, गाव कोणतं? हर हर महादेव चित्रपटावर वंशजांचे महत्त्वाचे आणि मोठे आक्षेप, पाहा नेमके मुद्दे काय?
हर हर महादेव चित्रपटावरील आक्षेप, प्रतिक्रिया आम्ही पाहिल्या. स्वतः चित्रपट पाहिला. त्यानंतर आम्ही काही आक्षेप मांडत आहोत..असे रुपाली देशपांडे म्हणाल्या...
अभिजित पोते, पुणेः हर हर महादेव (Har har Mahadev) चित्रपट प्रदर्शनाचा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande) यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्यातील युद्धाचा प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आलाय. तसेच चित्रपटातील इतरही अनेक मुद्द्यांवरून आक्षेप घेण्यात आलाय. या प्रकरणी आता बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज समोर आले आहेत. आज माध्यमांसमोर त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.
रुपाली देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘ बाजीप्रभू देशपांडे हे भोर जवळच्या सुभेदार वाडी शिंद या गावचे रहिवासी होते. पुण्यापासून ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. मूळ आडनाव प्रधान.
सीकेपी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये सीकेपी ज्ञातीचा इतिहास आहे. क्षत्रियांना शोभेल असा पराक्रम बाजीप्रभू यांनी केलेला आहे.. हर हर महादेव चित्रपटावरील आक्षेप, प्रतिक्रिया आम्ही पाहिल्या. स्वतः चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही आक्षेप मांडत आहोत, असे रुपाली पाटील म्हणाल्या.
नेमके आक्षेप काय?
- छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. बाजीप्रभू देशपांडे यांच्या तोंडून शिवाजी हा एकेरी उल्लेख वारंवार दाखवण्यात आलाय. ही अत्यंत खटकणारी गोष्ट आहे. ते तसा उल्लेख टाळू शकले असते.
- हिरडस मावळ येथील समुद्र किनारा दाखवला आहे. प्रत्यक्षात तिथे शिरवळला नीरा नदी आहे. आपल्या महाराष्ट्रीयन मुलींना इंग्रज घेऊन जात आहेत, असं दाखवलंय. त्या काळात खरच मावळमध्ये इंग्रजांचं प्राबल्य इतकं होतं का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आम्हीही इतिहास तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांचंही हेच मत आहे.
- बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे हे सख्खे भाऊ. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली एक तंटा दाखवलं आहे. फुलाजी प्रभूंनी विश्वासघात केल्याचं म्हटलंय. यामुळे फुलाजी प्रभू देशपांडे यांची प्रतिमा डागाळली गेली आहे. हे दोघेही बंधू स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले.
- सिनेमॅटिक लिबर्टी असावी. काल्पनिक कथेत ती असते. पण ऐतिहासिक गोष्टी बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही. ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणे चुकीचं आहे. त्यामुळे अनेक चित्रपट काढणाऱ्यांनाही संभ्रम होऊ शकतो.
- अफजलखानाचा वध झाला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे हे हजर नव्हते. पण चित्रपटात हा सीन दाखवलाय की ते हजर आहेत. हे इतिहासाला धरून आहे का? की त्या वेळी बाजीप्रभू देशपांडे आणखी काही मोहिमेवर होते?
- शिवा काशिदचा पराक्रमही नाकारल्यासारखा केलाय.
- बाजीप्रभू हे बांदल देशमुख यांचे सरनौबत होते. त्यांच्यात कुठल्या पद्धतीची भांडणं दाखवली, ती कदाचित दुसऱ्या कोणत्या कारणांवरून असतील. पण चित्रपटातली कारणं खटकणारी आहेत.
- अफजलखानाला बकरी दाखवून आणायचं तसं आणलं.. तशी बाजीप्रभू देशपांडेंनी देवळं बांधली, असं दाखवलं.. हे इतकं सोपं नाही.
- चित्रपट प्रदर्शनापूर्वी ऐतिहासिक माहिती असलेले इतिहास सल्लागारांची गरज असते. वंशजांनाही दाखवण्याची विनंती मी केली होती. पण कुणीही आमच्याशी संपर्क केला नाही.
सुभेदार वाडी या गावी राहणारे अमर वामनराव देशपांडे, त्यांचा मुलगा किरण अमर देशपांडे, सुभाष दिघे- अमर देशपांडे यांच्या बहिणीचा मुलगा, महेश देशपांडे, राहुल दिघे, चांद्रसेनीय सीकेपी यांच्यावतीने अध्यक्ष मंदार कुलकर्णी, राहुल दिघे, राजेंद्र देशपांडे आदी या वंशज पत्रकार परिषदेत उपस्थित होते.