मुंबई : प्रतीक गांधी (Pratik Gandhi) यांना महात्मा गांधीच्या रूपात पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांच्या ‘गांधी बिफोर इंडिया’ आणि ‘गांधी – द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड’ या दोन पुस्तकांवर आधारित ही वेब सीरिज (Web series) महात्मा गांधींच्या जीवनावर बनवली जात आहे. या सीरिजचे अनेक सीझन प्रदर्शित केले जातील, ज्यामध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या संघर्ष आणि चळवळीची कहाणी दाखवली जाणार आहे. दरम्यान, प्रतिक गांधी अभिनीत ही वेब सिरीज हंसल मेहता ( Hansal Mehta) दिग्दर्शित करणार असल्याची महत्वाची बातमी पुढे येते आहे.
प्रतिक गांधी आणि हंसल मेहता यांनी याआधी स्कॅम 1992 या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले आहे. स्कॅम 1992 ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेब सीरिजच्या यशानंतर पुन्हा एकदा हंसल मेहता आणि प्रतीक गांधी यांच्या उत्कृष्ट कामाची जादू प्रेक्षकांवर होणार का हे बघण्यासारखे ठरणार आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित अनेक किस्से आणि कथा या वेब सीरिजमध्ये दाखवल्या जाणार आहेत. ही वेब सीरिज भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहे.
महात्मा गांधीवरील ही वेब सीरिज अॅप्लॉज एंटरटेनमेंटद्वारे तयार केली जात आहे. कंपनीचे सीईओ समीर नायर म्हणाले, “महात्मा गांधींची कथा ही एका महापुरुषाच्या कथेपेक्षा अधिक आहे. ही एका राष्ट्राच्या जन्माची कथा आहे. अॅप्लॉज एंटरटेनमेंटसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे की, भारताची ही महत्त्वाची कथा आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा समृद्ध इतिहास आम्ही या वेब सीरिज द्वारे प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. एवढी सशक्त कथा सांगण्यासाठी सशक्त दिग्दर्शक लागतो आणि हंसलमध्ये आपल्याला एक उत्तम कथाकार मिळाला आहे. प्रतीक गांधी आणि हंसल मेहता यांच्यासोबत पुन्हा एकत्र काम करणे खूप भारी असेल.