दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या (Gajendra Ahire) प्रत्येक सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. बाईतलं बाईपण प्रभावीपणे मांडणारं संवेदनशील मन हे फार कमी पुरुषांकडे असतं. त्यापैकी एक म्हणजे गजेंद्र अहिरे होय. दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर गजेंद्र अहिरेंनी मोर्चा वळवला आहे तो वेब सीरिजकडे. चित्रपटाच्या कथेला प्राधान्य मिळवून देण्यासाठी जी धडपड त्यांची असते. तीच धडपड एक कथानक वेब सीरिजमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास गजेंद्र अहिरेंनी प्रयत्न केले आणि ‘साजिंदे’ (Sajinde) ही वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला आणली. ‘व्हीमास मराठी’ प्रस्तुत आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘साजिंदे’ ही रोमँटिक वेब सीरिज ‘व्हीमास मराठी’ या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘व्हीमास मराठी’च्या ‘राडा राडा’ या टॉक शो मधून प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे झळकल्या. त्यांच्या या टॉक शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
अभिनेत्री कश्मिरा ताकटे, अभिनेता ऋषिकेश वांबूरकर, अमित रेखी, अभिजित दळवी, ऋषिकेश पाठारे या कलाकारांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने साजिंदे या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. तर या वेब सीरिजमधून कश्मिरा हिने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. या सीरिजची कथा, पटकथा, संवाद, गीत, संगीत याची जबाबदारी गजेंद्र अहिरे यांनी स्वतः पेलवली आहे. तर या वेब सीरिजच्या संकलनाची बाजू ओंकार परदेशी याने सांभाळली आहे.
याबद्दल बोलताना गजेंद्र अहिरे म्हणाले, “एक फिल्म संपली की पुन्हा नवीन प्रयोग करायचा, ही अस्वस्थता कायम मला सतावत असते आणि म्हणूनच मी ‘साजिंदे’ या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. कथा माझ्याकडे तयार होती, शिवाय स्टारकास्टच्या सोबतीने ही आगळीवेगळी कथानक असलेली वेब सीरिज दिग्दर्शित केली. कथा, दिग्दर्शनासह या वेब सीरिजच्या संगीताची बाजूही मी सांभाळली आहे. एकूणच संपूर्ण चित्रीकरणाचा अनुभव विलक्षणीय होता. ‘साजिंदे’ या वेब सीरिजला ओटीटीवर आणण्यासाठी ‘व्हीमास मराठी’ या प्लॅटफॉर्मने उत्तम साथ दिली. त्यामुळेच ही सीरिज आज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.”