‘पंड्या स्टोर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अक्षय खरोदिया याने पत्नी दिव्या पुनेठासोबत घटस्फोट जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. अक्षयने दिव्यासोबतचे काही फोटो पोस्ट करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. या दोघांना एक मुलगी आहे. 2021 मध्ये अक्षय आणि दिव्याने लग्न केलं होतं. तर एप्रिल 2022 मध्ये दिव्याने मुलीला जन्म दिला होता. लग्नाच्या तीन वर्षांतच ही जोडी विभक्त होत आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिव्यासोबतच्या लग्नाचे, हनिमूनचे आणि मुलीसोबतचे फोटो पोस्ट करत घटस्फोटाची माहिती दिली आहे.
‘सर्वांना नमस्कार… जड अंत:करणाने मी माझ्या खासगी आयुष्याविषयी एक अपडेट शेअर करतोय. खूप विचार केल्यानंतर आणि असंख्य भावनिक संवादानंतर मी आणि दिव्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांसाठी हा अत्यंत कठीण निर्णय होता. माझ्या आयुष्यात दिव्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि आम्ही शेअर केलेलं प्रेम, हास्य आणि आठवणी माझ्यासाठी नेहमीच अमूल्य राहतील. आम्हाला एकत्रितपणे सर्वांत मोठी भेट मिळाली ती म्हणजे आमची मुलगी- रुही. जी नेहमीच आमच्या जगाचं केंद्र असेल. घटस्फोटाचं हे पाऊल उचलत असताना रुहीसाठी आमची बांधिलकी अतूट राहील. तिला तिच्या दोन्ही पालकांचं प्रेम, काळजी आणि पाठिंबा नेहमी मिळेल आणि आम्ही तिच्या आनंदासाठी प्रेमाने, आदराने सहपालकत्व स्वीकारू,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
‘आमच्या कुटुंबासाठी हे सर्वकाही सोपं नाही. या आव्हानात्मक काळातून जाताना तुम्ही समजूतदारपणा, दयाळूपणा दाखवावा अशी आमची इच्छा आहे. कृपया आम्हाला या वियोगाच्या क्षणासाठी नाही तर आम्ही एकमेकांसोबत एकेकाळी शेअर केलेल्या प्रेम आणि आनंदासाठी लक्षात ठेवा,’ अशी विनंती त्याने चाहत्यांना केली आहे.
अक्षयने ‘पंड्या स्टोर’ या मालिकेत शाइनी दोशी, किंशुक महाजन, एलिस कौशिक आणि कंवर ढिल्लन यांच्यासोबत काम केलं होतं. दिव्या आणि अक्षय हे लग्नापूर्वी काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. 19 जून 2021 रोजी त्यांनी देहरादूनमध्ये लग्नगाठ बांधली होती.