Paresh Rawal | पंतप्रधान मोदींवरील बायोपिकबद्दल परेश रावल यांनी केला मोठा खुलासा, मिळाली सर्व प्रश्नांची उत्तरं…
अभिनेते परेश रावल हे सध्या त्यांच्या ड्रीम गर्ल 2 च्या प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. त्याच दरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींवरील बायोपिकबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते असलेले परेश रावल (Paresh Rawal) यांचा ड्रीम गर्ल 2 चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दिसणार असून त्यामध्ये आयुष्मान खुराना हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. परेश रावल हे या चित्रटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून अनेक मुलाखती देत आहेत. एका मुलाखती दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिकबद्दलही (PM Modi Biopic) मोठा खुलासा केला आहे.
खरंतर गेल्या काही काळापासून अशी चर्चा सुरू होती की परेश रावल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट (बायोपिक) बनवणार आहेत. त्याचसंदर्भातील एक प्रश्न त्यांना नुकताच विचारण्यात आला. मात्र परेश रावल यांनी त्यावर स्पष्टपणे उत्तर देत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. ते पंतप्रधान मोदी यांच्यावरील बायोपिक बनवणार नाहीत, असे खुद्द परेश रावल यांनीच स्पष्ट केलं आहे. चित्रपटाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले ‘नाही… कारण यावर ( पीएम मोदी यांच्या आयुष्यावर) आधीच तीन-चार चित्रपट बनले आहेत.’
मनाच्या जवळचा विषय
यावेळी परेश रावल यांनी हा विषय आपल्या मनाच्या खूप जवळ असल्याची कबुली दिली. एखाद्या सामान्य माणसाने एवढ्या उंचीवर जाणे ही मोठी गोष्ट असल्याचे ते म्हणाले. पीएम मोदींच्या जीवनावर अनेक चित्रपट बनले आहेत ज्यापैकी एका चित्रपटात विवेक ओबेरॉयनेही प्रमुख भूमिका साकारली होती.
विशेष म्हणजे परेश रावल हे केवळ अभिनेतेचे नव्हे तर त्यासोबतच ते भाजपचे नेतेही आहेत. 2014 मध्ये त्यांनी अहमदाबाद पूर्व येथून लोकसभेची निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये ते 3 लाख 25 हजार मतांनी विजयी झाले होते. मात्र, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.
परेश रावल यांच्या आगामी प्रोजेक्टसबद्दल बोलायचे झाले तर सध्या त्यांच्याकडे वेलकम टू द जंगल, हेरा फेरी 3, आवारा पागल दिवाना 2 आणि डिअर फादर या गुजराती चित्रपटाचा हिंदी रिमेक यांसारखे अनेक चित्रपट आहेत. गुजराती भाषेत बनलेल्या डिअर फादरमध्येही परेश रावल हेच मुख्य भूमिकेत दिसले होते.