मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी 24 सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. लग्नानंतर परिणीती दिल्लीला तिच्या सासरी पोहोचली आहे. उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केल्यानंतर जवळच्या मित्रपरिवारासाठी हे दोघं रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता मुंबईत पार्टीचं आयोजन करण्यात येणार, अशी माहिती समोर येत आहे. यादरम्यान परिणीती आणि राघव यांचा हनिमून प्लॅन ते गिफ्ट पॉलिसीपर्यंत लग्नातील बऱ्याच गोष्टी चर्चेत आहेत. सेलिब्रिटींचं लग्न म्हटलं की पाहुण्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळणारच अशी अपेक्षा असते. त्यामुळे परिणीती आणि राघवला त्यांच्या लग्नात कोणी कोणती भेट दिली, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
परिणीती आणि राघवने त्यांच्या लग्नात नो गिफ्ट पॉलिसी म्हणजेच कोणतीही भेटवस्तू स्वीकारणार नसल्याचं ठरवलं होतं. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’ या आलिशान हॉटेलमध्ये पोहोचलेल्या पाहुण्यांकडून कोणतीच भेटवस्तू स्वीकारली गेली नव्हती. पंजाबी विवाहपद्धतीनुसार परिणीती आणि राघव लग्नबंधनात अडकले आणि त्यानंतर ‘मिलनी’साठी फक्त 11 रुपये पाहुण्यांकडून स्वीकारले गेले. मिलनी म्हणजेच लग्नातील एक अशी विधी जेव्हा वर आणि वधू पक्षांसह इतर नातेवाईक एकत्र येतात. तेव्हा वधू पक्षाकडून वर पक्षाच्या कुटुंबीयांना भेट दिली जाते. हे 11 रुपये याच भेटीच्या स्वरुपात स्वीकारले गेले होते.
परिणीती आणि राघव लग्नानंतर हनीमूनला कुठे जाणार, असा प्रश्न चाहत्यांना होता. मात्र हे दोघं हनीमूनला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. लग्नानंतर काही दिवस सासरी थांबल्यानंतर परिणीती पुन्हा एकदा तिच्या कामाला सुरुवात करणार आहे. त्याचप्रमाणे राघव चड्ढासुद्धा संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे व्यग्र होणार आहेत. म्हणूनच दोघांनी हनीमून पुढे ढकलण्याचा विचार केला आहे. उदयपूरमध्ये लग्न झाल्यानंतर ही जोडी थेट दिल्लीला रवाना झाली होती.
राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.