मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात हे दोघं त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहेत. त्यापूर्वी परिणिती आणि राघव यांनी नुकतंच उज्जैनमधल्या महाकाल मंदिरात जाऊन शंकराचं दर्शन घेतलं. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र यातील एका फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं असून त्यावरून परिणितीला ट्रोल केलं जातंय. या फोटोमध्ये परिणिती आणि राघव यांनी मंदिराच्या आवारात चप्पल घातल्याचं पहायला मिळतंय. त्यावरून नेटकरी दोघांवर टीका करत आहेत.
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. परिणिती आणि राघव यांनी लग्नापूर्वी याठिकाणी देवाचं दर्शन घेऊन विशेष पूजा आणि आरतीसुद्धा केली. मात्र यावेळी केलेली एक चूक दोघांना चांगलीच महागात पडली आहे. केवळ परिणिती आणि राघववरच नाही तर मंदिराच्या प्रशासनावरही नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. ‘चप्पल घालून कोण मंदिरात जातं’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘मंदिराच्या आवारातही चप्पल घालण्यास परवानगी नसते, मग हा नियम या सेलिब्रिटींना का नाही’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. दर्शनाच्या नियमांबाबत सेलिब्रिटी आणि सर्वसामान्यांमध्ये नेहमीच भेदभाव केला जात असल्याची तक्रारही काहींनी केली.
येत्या 25 सप्टेंबर रोजी परिणिती आणि राघव लग्नबंधनात अडकणार आहेत. हे लग्न राजस्थानमध्ये पार पडणार असल्याचं कळतंय. तर लग्नानंतर गुरूग्राममध्ये शाही रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी मे महिन्यात परिणिती आणि राघवने साखरपुडा केला. या साखरपुड्याला बॉलिवूड इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीचे नेते असल्याने या साखरपुड्याला राजकीय वर्तुळातून अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा समावेश होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीनेही सर्वांचं लक्ष वेधलं होतं. दिल्लीतल्या कपुरथळा इथल्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला होता.