इतरांच्या जीवनात विष कालवले, पती, मुलांना सोडून प्रियकरासह परदेशात पळून गेली, त्यानंतरचे आयुष्य…
तिचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला. पण, वडिलांचा व्यवसाय फसला. त्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर आले. इथूनच त्या अभिनेत्रीच्या संघर्षाचा प्रवास सुरू झाला. मोठ्या पडद्यावर इतरांच्या जीवनात ती विष कालवताना दिसली. पण, तिचे स्वतःचे आयुष्यही एखाद्या दुःस्वप्नासारखेच होते.
महाराष्ट्रातील सोलापूर येथे 4 ऑगस्ट 1932 रोजी त्यांचा जन्म झाला. वडिलांचा सोलापूरमध्ये मोठा व्यवसाय होता. पण, काही काळानंतर वडिलांचे व्यवसायात इतके नुकसान झाले की त्यांना शहर सोडून मुंबईला यावे लागले. सहा मुलांना घेऊन वडील मुंबईत पोहोचले. पण, त्यांच्याकडे ना घर होते ना पैसा. त्यामुळे मित्राच्या घरातच त्यांच्या कुटुंबाला आसरा घ्यावा लागला. घर चालवण्याच्या संघर्षात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना पुढे यावे लागले. घरातील मोलकरीण म्हणून त्या काम करू लागल्या. लहान वयातच झाडू, कपडे आणि भांडी घासून त्यांनी पैसे कमवायला सुरुवात केली. उत्पन्नाचे दुसरे काही साधन नव्हते. लहानपणीच ती दिसायला सुंदर होती. ती ज्या घरी काम करत होती त्या घरातील लोक म्हणायचे तू खूप सुंदर आहे. चित्रपटांसाठी प्रयत्न का करत नाही? यातूनच त्या लहान मुलीने काम करता करता नृत्य आणि गाणे शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला. मात्र, सिनेसृष्टीत संघर्ष करताना तिला अनेक चढ उतार पाहावे लागले. चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायिकांची भूमिका केली. पण, खऱ्या आयुष्यातही प्रेम मिळवण्यासाठी ती अखेरपर्यंत धडपडत राहिली. ही अभिनेत्री होती शशिकला जावळकर…
सहा भावंडांमध्ये शशिकला सर्वात सुंदर आणि प्रतिभावान होत्या. वडिलांनी तिला चित्रपटात काम करण्यासाठी पाठवले. शहरातील अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवणे त्याकाळीही सोपे नव्हते. तरीही 10 वर्षांच्या शशिकला कामाच्या शोधात फिल्म स्टुडिओला भेट देऊ लागल्या. एके दिवशी त्यांची भेट त्या काळातील यशस्वी अभिनेत्री नूरजहाँशी झाली. नूरचे पती शौकत हुसैन रिझवी हे झीनत नावाचा चित्रपट बनवत होते. नूरजहाँने या चित्रपटाच्या कव्वालीमध्ये शशिकला यांना एक छोटी भूमिका दिली. उत्कृष्ट अभिनयासाठी शौकत हुसैन यांनी तिला या चित्रपटासाठी 25 रुपये मानधन दिले. या चित्रपटामुळे शशिकला यांचे नूरजहाँ आणि शौकत यांच्याशी कौटुंबिक नाते निर्माण झाले. त्यांच्या सल्ल्यानेच पुढे शशिकला यांना इंडस्ट्रीत काम मिळाले.
काम मिळणे कठीण झाले.
नूरजहाँ हिच्या शिफारशीवर शशिकला पुढे काही चित्रपटांमध्ये दिसल्या. पण, त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यांना ज्या भूमिका मिळत होत्या त्या नकारात्मक होत्या. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर नूरजहाँ पतीसोबत पाकिस्तानात गेल्या. त्यामुळे शशिकला यांना पुन्हा काम मिळणे कठीण झाले. नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध अशी त्यांची इंडस्ट्रीत ओळख निर्माण झाली. मात्र, त्यांच्या या खलनायिके भूमिकेमुळे शशिकला यांचा लोक तिरस्कार करू लागले. मोठ्या पडद्यावर त्या सासू, वहिनी किंवा नायिकेच्या आयुष्यात उलथापालथ करणाऱ्या साईड कॅरेक्टरच्या भूमिकेत अनेकदा दिसल्या. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शशिकला यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आरती आणि गुमराह या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
लहान वयात लग्न केले पण…
शशिकला यांनी अगदी लहान वयात ओम प्रकाश सहगल यांच्याशी प्रेमविवाह केला. त्यांना दोन मुली होत्या. पण, लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांनंतर त्यांच्या वैवाहिक जीवनाला तडा गेला. मतभिन्नता वाढत गेली आणि दोघांच्या मारामारीला मर्यादा उरली नाही. त्यामुळे तिचे वैवाहिक जीवन विस्कळीत होऊ लागले. त्यावेळी शशिकला एका पुरुषाच्या जवळ आली. त्या दोघांमधील जवळीक इतकी वाढली की शशिकला यांनी पती आणि दोन मुलींचा विचार न करता विवाहबाह्य संबंधांसाठी घर सोडले.
भीक मागून मिळणारे अन्न खाऊ लागल्या
परंतु, विवाहबाह्य संबंधातून जे प्रेम मिळाले त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. नव्या आयुष्यासाठी शशिकला आपल्या प्रियकरासह परदेशात गेल्या. मात्र, ज्याच्यासोबत तिने स्थायिक होण्याचे स्वप्न पाहिले त्यानेच शशिकला यांचा छळ करण्यास सुरवात केली. मारहाण आणि छळ याचे प्रमाण इतके वाढले की शशिकला या परदेशातून पळून पुन्हा भारतात परतल्या. त्या पुन्हा जेव्हा भारतात आल्या त्यावेळी त्यांच्याकडे रहायला घर नव्हते. कुटुंबीयांनी तिच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे उघडले नाहीत. खायला पैसे नाही. घालायला कपडे नाही. अशावेळी शशिकला रस्त्यावर झोपल्या. भीक मागून मिळणारे अन्न खाऊ लागल्या.
2007 मध्ये पद्मश्रीने सन्मानित
काही महिन्यांनंतर शशिकला शांततेच्या शोधात आश्रम आणि मंदिरांना भेट देऊ लागल्या. कोलकाता येथे पोहोचल्यानंतर त्या मदर तेरेसा यांच्यासोबत राहू लागल्या. तिथे राहून त्यांनी 9 वर्षे लोकांची सेवा केली. तिथे शांतता मिळाल्यावर त्या मुंबईला परतल्या. पुन्हा त्या काम शोधू लागल्या. तेव्हा, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये त्यांना काम मिळाले. सोनपरी, जीना इसी का नाम है, दिल देके देखो यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये त्या दिसल्या. शाहरुख, अमिताभ, सलमान यांच्यासोबत त्यांनी परदेसी बाबू, बादशाह, कभी खुशी कभी गम, मुझे शादी करोगी आणि चोरी-चोरी या चित्रपटांमध्ये काम केले. 2005 मध्ये पद्मश्री लालू प्रसाद यादव हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. 2007 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. 4 एप्रिल 2021 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी शशिकला यांचे निधन झाले.