मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडेच्या अकस्मात निधनाच्या वृत्तामुळे कालपासून एकच खळबळ माजली होती. तिच्या मृत्यूनंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत होत्या . सर्व्हिकल कॅन्सरमुळे पूनमचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि लोकांना मोठा धक्काच बसला. अनेकांचा तर त्यावर विश्वासही बसला नाही, कित्येक लोकांनी पूनमच्या मृत्यूची ही बातमी खोटी असावी अशी शंका व्यक्त केली. तिच्या निधनाची बातमी कळताच काही लोकांनी शोक व्यक्त केला. हे प्रकरण पुढे गेले आणि विविध गोष्टी घडल्या. दरम्यान, पोलिसांना पूनम पांडेचा मृतदेहही सापडला नाही.
पण शनिवारची सकाळ उजाडताच लोकांना आणखी एक धक्का बसला. जिच्या मृत्यूची बातमी इतका वेळ सुरू होती, त्याच पूनमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकत आपण जिवंत असल्याचे जाहीर केले आणि मोठी खळबळ पुन्हा माजली. पण त्यामुळे लोकं आता बरेच भडकले असून त्यांना पूनमचा हा पब्लिसिटी स्टंट बिलकूल आवडलेला नाही. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला खडे बोल सुनावले आहेत.
पण खरं सांगायचं तर पब्लिसिटी स्टंटच्या नावाखाली बॉलिवूड स्टार्सनी लोकांना मूर्ख बनवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. हे याआधीसुद्धा इंडस्ट्रीत बरेच वेळा घडले आहे. त्यामध्ये अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींचा, स्टार्सच्या नावाचाही समावेश आहे. बॉलीवूड स्टार्सनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी बनावट प्रसिद्धी स्टंटचा अवलंब केला आणि ते लोकांच्या भावनांशी खेळले. असे अनेक किस्से आहेत.
गुलामसाठी आमिरने केलेला स्टंट होता चर्चेत
मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘गुलाम’ हा चित्रपट 1998 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. शूटिंगच्या या काळात ॲक्शन स्टंट करताना आमिर खान मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आल्याची बातमी समोर आली. ही बातमी जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचली तेव्हा लोक खूप काळजीत पडले. आणि आमिरबद्दल लोकांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला की, अपघातातून बचावल्यानंतरही तो शूटिंग करत आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले. तो केवळ एक पब्लिसिटी स्टंट होता.
फेक न्यूजमुळे मलायका अरोराही आली होती चर्चेत
काही काळापूर्वी अभिनेत्री मलायका अरोराच्या प्रेग्नन्सीची बातमी समोर आली होती. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र त्यानंतर, जेव्हा मलायकाने ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आणि ‘मूव्हिंग विथ मलायका’ या शोबद्दल जाहीर केलं, तेव्हा लोकांना त्याचं कनेक्शन लक्षात आलं. मलायकाच्या प्रेग्नन्सीची बातमी हे तिच्या शोच्या प्रमोशनचे साधन होतं, असं स्पष्ट झालं. मात्र त्यावरही बरीच टीका झाली होती. तिचा हा स्टंट किम कार्दशियनपासून प्रेरित मानला गेला.
विद्या बालनने जेव्हा रस्त्यावर मागितली भीक
‘बॉबी जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री विद्या बालनने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगळा मार्ग शोधला होता. तेव्हा ही अभिनेत्री हैदराबादच्या रस्त्याच्या कडेला भीक मागताना दिसली होती. तेव्हा एका महिलेने तिला त्याबद्दल खडसावत काही काम करण्याचा सल्लाही दिला. मात्र भीक मागणारी महिला दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन होती, याचा खुलासा नंतर झाला.