मुंबई : 11 डिसेंबर 2023 | हास्य कलाकार आणि मराठी दिग्दर्शक-अभिनेता प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत या चित्रपटाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मराठी चित्रपटाला थिएटर उपलब्ध करून दिलं जात नसल्याबद्दलचा प्रश्न भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता चित्रपटाला शोज मिळत असून त्याला प्रेक्षकांकडूनही दमदार प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने गेल्या तीन दिवसात चांगली कमाई केली आहे.
प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि समिक्षकांकडून मिळालेले चांगले रिव्ह्यू याच्या जोरावर ‘एकदा येऊन तर बघा..’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा पाच कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. गेल्या तीन दिवसांतील कमाईचा हा आकडा थक्क करणारा आहे. याशिवाय प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून मुंबई आणि पुण्यात स्क्रीन्स वाढवण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
मुंबई- 107.12 लाख रुपये
मध्य महाराष्ट्र- 82.37 लाख रुपये
मराठवाडा- 24.43 लाख रुपये
परदेशातील कमाई- 56.08 लाख रुपये (अमेरिका/ जर्मनी/ ऑस्ट्रेलिया)
आतापर्यंत या चित्रपटाने 5.03 कोटी रुपयांची कमाई केली असून बजेटचा आकडा पार झाला आहे. त्यामुळे यापुढील कमाई ही चित्रपटाच्या टीमसाठी नफा देणारी ठरेल. या नवीन आठवड्यातही कोणताच मोठा चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने त्याचा फायदा प्रसाद खांडेकरच्या चित्रपटाला होऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा चित्रपट कमाईचा 10 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत.
प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात बरेच विनोदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, वनिता खरात, रोहित माने अशी कलाकारांची मोठी फौजच यामध्ये पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकरनेच केलं आहे.