मुंबई, दिल्ली नव्हे थेट बिहारमध्ये ‘पुष्पा 2’ चा ट्रेलर लाँच, अल्लू अर्जुनचं बिहार कनेक्शन काय?
Pushpa 2 Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनने अभिनेत्री रश्मिका मंधानासह पाटण्यात 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. अल्लू अर्जूनने यासाठी मुंबई, राजधानी दिल्ली सोडून पाटणा शहर का निवडलं? याची चर्चा रंगली आहे. अल्लू अर्जूनच्या बिहार कनेक्शनविषयी जाणून घ्या.
अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा ट्रेलर बिहारच्या पाटण्यातील गांधी मैदानात लॉन्च करण्यात आला. या कार्यक्रमात लोकांच्या गर्दीतून जोरदार प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं. ‘पुष्पा झुकेगा नही,’ असं लोकांच्या गर्दीतून ऐकू येताच अल्लू अर्जुन म्हणाला की, ‘तुमच्या प्रेमासमोर पुष्पा नतमस्तक झालाय.’ दरम्यान, अल्लू अर्जूनने ‘पुष्पा 2’ च्या ट्रेलर रिलीजसाठी मुंबई, राजधानी दिल्ली सोडून पाटणा शहर का निवडलं, याची चर्चा रंगली आहे.
पॅशन, पॅशन आणि पॅशनने भरलेल्या लोकांसाठी रविवारचा दिवस खूप खास होता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा ट्रेलर पाटणाच्या गांधी मैदानावर प्रदर्शित करण्यात आला. भारतीय चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन गांधी मैदानात पोहोचताच अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी तोबा गर्दी जमली होती.
मुंबई, दिल्ली सोडून पाटण्यात ट्रेलर रिलीज का केला?
मुंबई, दिल्ली सोडून ‘पुष्पा 2’चा ट्रेलर लॉन्च सोहळा पाटण्यात होण्याचं कारण म्हणजे त्याच्या पहिल्या चित्रपटाची प्रचंड लोकप्रियता. 2021 साली आलेल्या ‘पुष्पा: द राईज’ला बिहारच्या प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. चित्रपटाचे संवाद, गाणी आणि अल्लू अर्जुनचा देसी लूक इथल्या लोकांना खूप आवडला. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पराज’ स्टाईलमध्ये अभिनेता धोतर आणि फाटलेल्या चप्पलमध्ये दिसला होता.
चित्रपटात काय खास?
‘पुष्पा 2: द रूल’चे दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता अल्लू अर्जुन यांनी यावेळी या चित्रपटाची तयारी आणखी मोठ्या पातळीवर केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या सिक्वेलमध्ये उत्तर भारतातील अनेक राज्यांची झलक पाहायला मिळणार आहे. यामुळे चित्रपटाची कथा अधिक रोमांचक होणार आहे.
चित्रपट कधी रिलीज होणार?
अभिनेत्री रश्मिका मंदानाची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक बेभान झाले. रश्मिका स्टेजवर येताच तिने हात जोडून सर्वांचे स्वागत केले आणि नमस्ते पाटणा म्हटले. तिचे बोलणे ऐकून प्रेक्षकांनी भरभरून टाळ्या वाजवल्या. यावेळी अभिनेत्री म्हणाली की, पुष्पाची श्रीवल्ली सर्वांचे स्वागत करते. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर पुष्पा 2 हा चित्रपट आपल्या सर्वांसमोर आला आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘चित्रपटांची निर्मिती करा, सरकार मदत देईल’
दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी कलाकारांचे स्वागत केले आणि सांगितले की, बिहार देशातील सर्व कलाकारांचे स्वागत करतो. बिहारमध्ये चित्रपट धोरण लागू करण्यात आले आहे. तुम्ही बिहारमध्ये चित्रपटांची निर्मिती करा, त्यासाठी सरकारकडून मदत केली जाईल. पुष्पा 2 चित्रपटाला बिहारच्या लोकांचे अपार प्रेम मिळणार आहे. दक्षिण भारतातून कलाकार पहिल्यांदाच राजधानीत आले आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यात या चित्रपटाला भरघोस यश मिळणार आहे.