सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीकडून मोठा खुलासा

| Updated on: May 09, 2024 | 1:29 PM

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यापैकी राजस्थानमधून अटक केलेल्या रफीक चौधरी या आरोपीने चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीकडून मोठा खुलासा
सलमान खान
Follow us on

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. अटकेत असलेला आरोपी रफीक चौधरीने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. फक्त सलमान खानच नाही तर त्याच्यासह इतर दोन अभिनेत्यांच्या घराचाही रेकी केली होती, असं त्याने सांगितलं आहे. रफीक चौधरीला पोलिसांनी दोन दिवसआधी राजस्थानमधून अटक केली होती. त्यानेच मुख्य आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले होते. पोलिसांनी त्याला राजस्थानमधून अटक करून मुंबईला आणलं होतं. सलमानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे.

14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सलमानच्या मुंबईतील वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोघांनी गोळीबार केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी सर्वांत आधी सागर आणि विकी या दोघांना अटक केली होती. त्यानंतर अनुज थापन आणि सोनू यांना अटक करण्यात आली. सागर आणि विकी यांची कोणतीच गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली नाही. मात्र अनुज आणि सोनू यांच्याविरोधात पंजाब आणि हरयाणामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी गुंड लॉरेन्स बिष्णोईचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोईने घेतली होती.

हे सुद्धा वाचा

अटक केलेल्या पाच आरोपींपैकी अनुज थापन याने कोठडीत आत्महत्या केली. 32 वर्षीय अनुजने मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. थापनला ज्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं, त्यात एकूण दहा आरोपी होते. सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील इतर दोन आरोपींना पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी नेलं होतं. त्यावेळी थापन इतर आरोपींसह कोठडीतच होता. दुपारी 12 च्या सुमारास आरोपींना देण्यात येणाऱ्या चादरीचा तुकडा फाडून तो शौचालयात गेला. तिथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 1 वाजताच्या सुमारास इतर एका आरोपीने हा प्रकार पाहिला आणि त्याने आरडाओरडा करून पोलिसांना बोलावलं. त्यानंतर थापनला तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.