Rajinikanth | योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्याने रजनीकांत जोरदार ट्रोल; नेटकरी म्हणाले ‘स्वत:ची प्रतिमा..’

| Updated on: Aug 21, 2023 | 1:10 PM

रजनीकांत हे त्यांचा 'जेलर' हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पाहणार होते. भेटीच्या आधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याविषयीची माहिती दिली होती. लखनऊमध्ये आयोजित या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यासुद्धा पोहोचले होते.

Rajinikanth | योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्याने रजनीकांत जोरदार ट्रोल; नेटकरी म्हणाले स्वत:ची प्रतिमा..
Rajinikanth and Yogi Adityanath
Image Credit source: Twitter
Follow us on

लखनऊ | 21 ऑगस्ट 2023 : साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनय, स्टाइल आणि तुफान फॅन फॉलोईंगसाठी ओळखले जाणारे रजनीकांत सध्या ‘जेलर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. यादरम्यान थलायवा रजनीकांत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून रजनीकांत यांना ट्रोल केलं जातंय. काही चाहत्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

रजनीकांत यांनी लखनऊमध्ये योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘वाया घालवलेली भेट.. रजनीकांत यांनी स्वत:चीच प्रतिमा खराब करून घेतली’, असं एकाने लिहिलं. तर ‘ही तमिळनाडूसाठी लज्जास्पद बाब आहे. अध्यात्मचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वत:चाच सन्मान विसरून जाल’, अशी टीका दुसऱ्या युजरने केली. तर ’72 वर्षीय रजनीकांत हे 51 वर्षीय योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श करत आहेत’, असंही काहींनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

रजनीकांत हे त्यांचा ‘जेलर’ हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पाहणार होते. भेटीच्या आधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याविषयीची माहिती दिली होती. लखनऊमध्ये आयोजित या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यासुद्धा पोहोचले होते. त्यांनी या चित्रपटातील कलाकारांचं तोंडभरून कौतुक केलं.

रजनीकांत यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केलं. ‘जेलर’ हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे. याआधी मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ आणि ‘2.0’ या दोन चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली होती. जेलर या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच विनायकन, रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी आणि मिर्ना मेनन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर तमन्ना भाटिया, मोहनलाल, जॅकी श्रॉफ आणि शिवा राजकुमार हे कलाकार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.