मला श्रीदेवी आवडायची, त्यांची लेक आवडत नाही – राम गोपाल वर्मा थेट बोलले
चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रीदेवी आणि त्यांची मुलगी जान्हवी कपूर यांची तुलना केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना त्याची आईचं काम आणि स्वभाव आवडायचा, पण त्यांची मुलगी आवडत नाही. यासोबतच जान्हवीसोबत चित्रपट करण्याचा ही राम गोपाल वर्मा यांचा मानस नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या आणि अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवत, कायम लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या अभिनयाचं कौतुक करताना लोक आजंही थकत नाहीत. बॉलिवूडचे नामवंत दिग्दर्शक राम गोपल वर्मा हे देखील श्रीदेवीचे मोठे फॅन, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा देत, तिच्याबद्दल अनेक आठवणी सांगितल्या.
मात्र त्याचवेळी ते श्रीदेवी यांची मुलगी, अभिनेत्री जान्हवी कपूरबद्दल जे बोलले, त्याची बरीच चर्चा सुरू आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.
अभिनेत्री जान्हवी कपूर ही दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरसोबत देवरा या चित्रपटात दिसली होती, या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाच्या फोटोशूटदरम्यान अभिनेता ज्युनिअर एनटीआरने जान्हवी कपूरबद्दल सांगितले की, ती अगदी तिच्या आईसारखी दिसते. मात्र चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर बोलताना त्यांनी या गोष्टीला चक्क नकार दिला. जान्हवीमध्ये अजूनही श्रीदेवी दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीदेवीला प्रेक्षक म्हणून पाहायचो
रामगोपाल वर्मा यांनी मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी श्रीदेवी यांचे कौतुक करत सांगितले की, ‘पहाड़ाला वायसू’ असो किंवा ‘वसंत कोकिला’, श्रीदेवी यांनी अनेक उत्तम परफॉर्मन्स दिले आहेत. खरं तर त्यांना अभिनय करताना पाहून मी चित्रपट निर्माता आहे हे विसरून जायचो आणि प्रेक्षक म्हणून श्रीदेवी यांचे कडे पाहायचो, एवढे सुंदर अभिनय आणि काम त्या करत असे.
जान्हवीशी खास कनेक्शन नाही
मुलाखतीदरम्यान जेव्हा राम गोपाल वर्मा यांना जान्हवी कपूरबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, मला तिची आई श्रीदेवी यांचे काम आवडायचे, पण मुलगी जान्हवीचे अदयाप असे काही खास कनेक्शन नाही, मला ती आवडत नाही, असे ते थेट बोलले. पण हे नकारात्मकपणे म्हणत नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माझ्या कारकिर्दीत असे अनेक मोठे कलाकार आले, ज्यांच्याशी विशेष संबंध निर्माण झाले नाहीत, त्यात जान्हवी कपूरचे नावही समाविष्ट आहे. त्याचबरोबर सध्या तरी जान्हवीसोबत चित्रपट करण्याचा त्यांचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, जान्हवी सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, तर चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा देखील पुनरागमनाच्या तयारीत आहेत. लवकरच ते मनोज बाजपेयीसोबत काम करताना दिसणार आहे.