दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध कलाकार आणि रॅपर कोस्ट त्सोबानोग्लू याचं स्टेजवर परफॉर्म करताना निधन झालं. कोस्टा टिच या नावानेही तो ओळखला जायचा. या निधनाच्या वृत्ताने कोस्टाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शनिवारी जोहान्सबर्ग याठिकाणी पार पडलेल्या अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये तो परफॉर्म करत होता. त्याचवेळी तो स्टेजवर कोसळला आणि त्याचं निधन झालं. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अवघ्या 27 व्या वर्षी कोस्टाने या जगाचा निरोप घेतला.
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या अस्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलला कोस्टाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या चाहत्यांसाठी त्याने एकापेक्षा एक दमदार गाणीसुद्धा गायली. मात्र कोस्टाचा हा अखेरचा परफॉर्मन्स असेल याची कोणी कल्पनासुद्धा केली नसेल. कोस्टाच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ काही चाहत्यांनी शूट केला होता. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो स्टेजवर परफॉर्म करतानाच कोसळताना दिसतोय.
RIP Costa Titch pic.twitter.com/zQN4pvl6hD
— ?????? (@nwanyebinladen) March 11, 2023
या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की कोस्टाच्या गाण्यांवर उपस्थित प्रेक्षकांनी ताल धरला आहे. मात्र अचानक तो स्टेजवर पडतो. मात्र त्याच्या जवळच उभा असलेला व्यक्ती त्याला उचलतो. कोस्टाचा पाय अडखळला असावा आणि त्यामुळेच तो पडला असावा असं प्रेक्षकांना वाटतं. मात्र दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा खाली कोसळतो. स्टेजवर परफॉर्म करतानाच त्याचं निधन झालं. दक्षिण आफ्रिकेतील सेलिब्रिटी फिल एमफेलाने शनिवारी रात्री ट्विट करत कोस्टाच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
कोस्टा टिचचा जन्म नेल्स्प्रूटमध्ये झाला होता. 27 वर्षीय कोस्टाला दक्षिण कोरियातील प्रतिभावान रॅपर आणि गीतकार मानलं जायचं. त्याला डान्सची फार आवड होती. सुरुवातीला छंद म्हणून त्याने डान्सचा मार्ग निवडला. मात्र वयाच्या 15 व्या वर्षी मित्र बेनी चिलसोबत त्याने डान्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी 2014 मध्ये तो जोहान्सबर्गला आला. तिथे तो ‘न्यू एज स्टीझ’ या डान्स ग्रुपमध्ये तुमी त्लादी आणि फँटम स्टीझ यांच्यासोबत सहभागी झाला.
कोस्टाने विविध आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. डान्ससोबतच त्याने रॅपिंगवरही भर दिला. रॅपसाठी त्याने स्वत:ची अशी वेगळी स्टाइल निर्माण केली.