मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री रत्ना पाठक शाह सध्या त्यांच्या आगामी ‘धक धक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळी मतं मांडली आहेत. रत्ना यांनी हेसुद्धा सांगितलं की त्यांनी ‘धक धक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी वयाच्या 65 व्या वर्षी बाईक चालवायला शिकल्या. त्याचसोबत फिल्म इंडस्ट्रीतील काही ज्येष्ठ अभिनेत्रींना काम मिळत नसल्याचीही तक्रार त्यांनी यावेळी केली.
ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांना नुकताच प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. मात्र या पुरस्कारावरून रत्ना यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. “महान कलाकारांना फक्त पुरस्कार देणंच पुरेसं नसतं, त्यांना कामसुद्धा मिळालं पाहिजे”, असं त्या म्हणाल्या. फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “जेव्हा मी मेरिल स्ट्रीप (74 वर्षे) आणि हेलन मिरेन (78 वर्षे) यांना पाहते तेव्हा मला वाटतं की जर ते असं करू शकतात, तर मीसुद्धा करू शकते. मला याची खंत वाटते की आपल्या देशात वहीदा रहमान यांना तशा भूमिका मिळत नाहीत, ज्या त्यांना खऱ्या अर्थाने मिळाल्या पाहिजेत. त्या खूप दमदार अभिनेत्री आहेत. त्यांना फक्त इतकंच करायचं आहे की एखादा छोटासा पुरस्कार देऊन त्यांना एका कोपऱ्यात बसवायचं आहे. खरंच का? कृपया त्यांना चांगल्या भूमिकांची ऑफर द्या. पुरस्कार तुम्ही स्वत:कडेच ठेवा.”
“आपण कसे दिसतोय या गोष्टीशी तुम्हाला तडजोड करावीच लागेल. हे सत्य आहे की तुमचं शरीर सतत बदलत जाणार आणि जर मला त्याच्याशी फार छेडछाड करायची नसेल तर मी कोण आहे याचा स्वीकार तुम्हाला करावा लागेल. एक महिला म्हणून मी विचार करायची ही अभिनय करण्याची एक शेल्फ लाइफ असते. जोपर्यंत मी सुंदर दिसेन तोपर्यंत मी अभिनय करू शकेन आणि त्यानंतर दुसरं काहीतरी करेन असं मला वाटायचं. मलाच माझ्या या विचारांवर विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे, एकेकाळी मीसुद्धा असा विचार केला होता”, असंही त्या पुढे म्हणाल्या.