मुंबई : अभिनेत्री हंसिका मोटवानीने कमी वयापासूनच इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये जरी तिने मोजके चित्रपट केले असले तरी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच ती तिच्या आगामी ‘पार्टनर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी पत्रकार परिषदेत तिच्या सहकलाकाराने असं काही वक्तव्य केलं, ज्यामुळे सोशल मीडियावर राग व्यक्त करण्यात येत आहे. तमिळ अभिनेता रोबो शंकर याने हंसिकाला स्पर्श करण्याबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याच्या वक्तव्यानंतर हंसिकाच्या चाहत्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रोबो शंकरने सांगितलं की एका सीनदरम्यान त्याला हंसिकाच्या पायांना स्पर्श करायचा होता. मात्र तिने असं करू दिलं नाही. इतकंच नव्हे तर तिने तिच्या पायाच्या अंगठ्यालाही स्पर्श करू दिलं नसल्याची तक्रार त्याने केली. मात्र जेव्हा हिरोने तिला स्पर्श केला, तेव्हा हंसिकाला काहीच आक्षेप नव्हता, असं तो म्हणाला. हिरो असल्याचा हा फायदा असतो असंही त्याने म्हटलंय. रोबो शंकर हे वक्तव्य करत असताना हंसिका तिथेच मंचावर उपस्थित होती. मात्र नंतर त्याने हे स्पष्ट केलं की तो मस्करी करत होता. त्यामुळे त्याच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहू नये. मात्र नेटकऱ्यांना त्याची ही वागणूक पसंत पडली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपटाच्या टीमने नंतर रोबो शंकरच्या वतीने हंसिकाची माफी मागितली.
रोबो शंकरने असं वक्तव्य करून मर्यादा ओलांडली, असं एकाने म्हटलं. तर ‘ज्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी कसं बोलावं हे कळत नाही ते अभिनयासाठीही अयोग्य आहेत’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने राग व्यक्त केला. ‘अशा वक्तव्यांमुळे वाईट वृत्तीला आणखी वाव मिळतो’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. रोबो शंकरच्या वक्तव्यानंतर अभिनेता जॉन विजय आणि संपूर्ण टीमने माफी मागितली.
रोबो शंकरला ‘कलक्का पोवतू यारु’ या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने अभिनयास सुरुवात केली. त्याने मारी, वेलैनु वंधुता वेल्लकारण यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. गेले काही महिने तो कावीळमुळे आजारी होता. या आजारातून बरं झाल्यानंतर त्याने प्रमोशनमध्ये भाग घेतला.
हंसिका मोटवानीने व्यावसायिक सोहैल कथुरियाशी लग्न केलं. 4 डिसेंबर 2022 रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. सोहैल आणि हंसिका हे बिझनेस पार्टनर्ससुद्धा आहेत. ‘कोई मिल गया’मधील तिची भूमिका प्रेक्षकांना आजही चांगलीच लक्षात असेल. त्यानंतर तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.