RRR फेम प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रामचरण हा अयप्पा यांचा अनुयायी आहे. नुकतीच त्याने मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात अयप्पा दीक्षा संपन्न केली. रामचरण आणि त्याचे कुटुंबीय अध्यात्मिक असून ते स्वामी अयप्पा यांची पूजाअर्चना करतात.
अयप्पा दीक्षा हे स्वामी अयप्पांच्या भक्तांद्वारे पाळलेलं एक पवित्र व्रत असतं. हे व्रत करताना अत्यंत कठोर नियमांचं पालन करावं लागतं. व्रताच्या दिवसांत फक्त काळे कपडे आणि अयप्पा माळा परिधान करावे लागतात. त्याचप्रमाणे हे व्रत करताना पायात चप्पल घालू शकत नाहीत.
रामचरण दीक्षेच्या काळ्या वस्रातच अनवाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचला. दीक्षेच्या अखेरच्या दिवशी त्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
मुंबईतील दादर इथल्या सिद्धिविनायक मंदिराचं गणेशभक्तांच्या मनात विशेष स्थान आहे. म्हणूनच अयप्पा दीक्षा संपन्न करण्यासाठी रामचरणने या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचं ठरवलं.
रामचरणने याआधी RRR या चित्रपटाच्या वेळी अयप्पा दीक्षेचं पालन केलं होतं. आता मुलीच्या जन्मानंतर त्याने पुन्हा एकदा अयप्पा दीक्षेचं पालन केलं आहे. बऱ्याच वर्षांनंतर रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं.