छोट्या दोस्तांना भेटायला येणार ‘चार यार पक्के’, नवीन बालनाट्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
सचिन शिर्के आणि पंकज शर्मा दिग्दर्शित 'चार यार पक्के' हे नवं कोरं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.
मुंबई : कोरोनामुळे लहान मुलं बराच काळ घरात राहिली. त्यांची खेळायची सवय जवळ-जवळ मोडली. पण आता सगळं हळूहळू पुर्ववत होतंय. सगळ्या गोष्टी सुरू होत आहेत. अश्यातच आता लहान मुलांच्या मनोरंजनाचा दरवाजा आता उघडला आहे. कारण एक धम्माल बालनाट्य छोट्या दोस्तांच्या भेटीला येतंय. त्यामुळे छोट्या दोस्तांनो, धम्माल-मजा-मस्ती करण्यासाठी सज्ज व्हा. सचिन शिर्के (Sachin Shirke) आणि पंकज शर्मा (Pankaj Sharma) दिग्दर्शित ‘चार यार पक्के‘ (Char Yaar Pakke) हे नवं कोरं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या नाटकात गरीब घरातील मुलं काम करत आहेत. त्यांच्या कलेचा आस्वाद करण्यासाठी आणि त्यांच्या कलेला दाद देण्यासाठी या बालनाट्याच्या प्रयोगाला नक्की हजेरी लावा.
धम्माल आणणारं नाटक
‘चार यार पक्के’ हे बालनाट्य असल्याने यात मनोरंजनाचा खजाना आहे. लहान मुलांना खळूनखळून हसवणारं आणि तितकंच अंतर्मुख करणारं हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. पल्लवी फाऊंडेशनचे भाऊ कोरगावकर आणि चंद्रशिला आर्ट्स निर्मित हे नाटकं बालमित्रांचं निखळ मनोरंजन करणारं आहे.
कलाकार मंडळी
‘चार यार पक्के’या नाटकाचं लेखन पंकज शर्मा आणि मृणालिनी जावळे यांनी केलं आहे. तर सचिन शिर्के आणि पंकज शर्मा यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. झाडाच्या भूमिकेत सचिन शिर्के पहायला मिळतील. तर रात्रीस खेळ चाले -2 मधला काशीही या नाटकात महत्वाची भूमिका साकारतोय. डॉ निखिल राजेशिर्के सुत्रधाराच्या भूमिकेत आहे. शितल क्षीरसागर धम्माल फळवाळीच्या भूमिका साकारतेय. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या नाटकात गरीब घरातील मुलं काम करत आहेत. प्रबोधन कुर्ला मराठी शाळेचे हे विद्यार्थी आहेत.
या नाटकात हिंदी आणि मराठी अश्या दोन्ही भाषांचा वापर करण्यात आला आहे. ‘चार यार पक्के’चा शुभारंभाचा प्रयोग 13 मार्चला रविवारी दुपारी साडे चार वाजता गोदरेज डान्स थिएटरमध्ये होणार आहे.
संबंधित बातम्या