61 लाखांची फसवणूक प्रकरणी सागर कारंडेची प्रतिक्रिया, म्हणाला, तो मी नव्हेच…
'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्यावर सागर कारंडेने प्रतिक्रिया दिली आहे.

मराठमोळा विनोदवीर सागर कारंडेची 61 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. सायबर गुन्हेगारांनी सागर कारंडेला 61 लाख रुपयांना फसवल्याचे प्रकरण चर्चेत होते. या प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी 3 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता या प्रकरणावर स्वत: सागर कारंडेने प्रतिक्रिया दिली आहे.
सागर कारंडेने नुकताच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. त्याला या प्रकरणाबाबत विचारले असता त्याने, ‘हे फेक आहे. असं काही झालेलं नाही आणि 61 लाख रुपये माझ्याकडे का असतील? एवढे पैसे कुठे आहेत माझ्याकडे. 61 लाख रुपये खूप मोठी रक्कम आहे. तेवढे असते तर मी कशाला बाकी गोष्टी करेन. मी एखाद्या नाटकाची निर्मिती केली असती. काही नाही फेक आहे ते’ असे उत्तर दिले आहे.
वाचा: सर्वांसमोर अमरीश पुरींनी स्मिता पाटीलच्या लगावली होती कानशिलात, नंतर अभिनेत्रीने जे काही केलं…




सागर नेमकं काय म्हणाला?
तसेच या प्रकरणी तपास घेणार असल्याचे देखील सागर कारंडेने सांगितले आहे. ‘मी मुंबईला गेल्यानंतर तपास घेणार आहे. पोलीस ठाण्यात जाणार आहे. मी अब्रू नुकसानीचा दावा देखील करणार आहे’ असे सागर कारंडे म्हणाला. पुढे त्याने या प्रकरणामुळे चाहते दुखावले गेले नाहीत असे स्पष्ट म्हटले आहे. ‘असं काही घडलच नाही तर चाहते दुखावले का जातील? सगळ्यांनी अलर्ट राहावे. आपले यूपीआय जे काही… कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. एवढं सरळ साधं आहे’ असे सागर म्हणाला.
काय आहे प्रकरण?
फेब्रुवारी 2025 मध्ये एका अनोळखी महिलेने सागर कारंडेला एक व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. व्हॉट्सअॅपवरून सागर कारंडे आणि तिच्यात बोलणे झाले होते. त्यावेळी महिलेने त्याला एक स्किम सांगितली होती. तिने इन्स्टाग्रामवरील काही पोस्ट ‘लाईक’ करण्याचे काम देऊ केले होते आणि प्रत्येक लाईकसाठी 150 रुपये मिळतील, असे देखील सांगितले होते. दिवसाला साधारण 6,000 रुपये कमावता येतील, असेही तिने म्हटले होते. सागरने तिला होकार दिला आणि तिथेच तो फसला. त्या महिलेने तब्बल 61 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानंतर सागरने तात्काळ पोलिसांत धाव घेऊन आपबिती सांगितली आणि तक्रार दाखल केली. सध्या सायबर क्राईम विभाग या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. पण आता सागर कारंडेने यावर प्रतिक्रिया देत तो व्यक्ती मी नाही… माझ्यासोबत असे काही घडले नाही… मी अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.