Saif Ali Khan Attack : चोरी की अजून काही… सैफच्या हल्लेखोराबद्दल मोठा खुलासा, रात्रभर घरातच दबा धरून बसला होता, रात्री तो वाद नेमका कशामुळे?
अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरातच चाकू हल्ला करण्यात आला. घरात घुसलेल्या चोराशी सैफची थोडी झटापट झाली आणि चोराने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. त्याच्यावर एकूण सहा वार करण्यात आले. त्यानंतर तो चोर पळून गेला.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरातच चाकू हल्ला करण्यात आला. घरात घुसलेल्या चोराशी सैफची थोडी झटापट झाली आणि चोराने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. त्याच्यावर एकूण सहा वार करण्यात आले. त्यानंतर तो चोर पळून गेला. मध्यरात्रीच्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावर सध्या सर्जरी सुरू असून दोन जखमा खोल असल्याचे समजते, तसेच त्याच्या पाठीच्या कण्याजवळी एक जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि ॲनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. याचदरम्यान हल्लेखोराविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे,
सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला, ती व्यक्ती रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोराचा रात्री 2 वाजता सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सूरु असल्याचा आवाज सैफअली खानला आला. आवाज ऐकून तो बाहेर आला आणि हा प्रकार घडला, हल्लेखोराशी सैफची झटापट झाली आणि त्याने केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला.
दरम्यान हा हल्लेखोर घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का ? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का ? याचा पोलिस तपास करत आहेत. सैफ राहतो त्याच इमारतीत पॉलिशिंगचं काम सुरू आहे. ते काम करणाऱ्या व्यक्तींपैकी, कामगारांपैकीच कोणी हल्लेखोर आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरात काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि त्याने मोलकरणीसोबत वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सैफसोबतच मोलकरणीवरही अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. या हल्ल्यात तिच्या हाताला दुखापत झाली. तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मोलकरणीच्या भूमिकेवर संशय आहे. मोलकरणीने चोराच्या प्रवेशाची सोय केली होती का? असा संशय त्यांना आहे. वैद्यकीय उपचारानंतर मोलकरणीचा जबाब नोंदवला जाईल.
सैफची टीम काय म्हणाली ?
या घटनेबाबत सैफ अली खानच्या टीमने सांगितले की, अभिनेत्याच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना संयम बाळगण्याची विनंती करतो. तो हल्लेखोर कोण होता, तो कुठून आला होता, हल्ल्याचा उद्देश काय होता, याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. तो चोर होता की आणखी कोणी? त्याचा हेतू फक्त चोरीचा होता का? त्याला कोणी टार्गेट केले होते का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुन्हे शाखेचे पथक व्यस्त आहे.