मुंबई- आई कुठे काय करते आणि मुलगी झाली हो या स्टार प्रवाह वाहिनीवरील दोन लोकप्रिय मालिका आहेत. याच दोन्ही मालिकेच्या कलाकारांनी ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. कार्यक्रमात दोन्ही मालिकेच्या कलाकारांनी चांगलाच धिंगाणा घेतला. मात्र यातली लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे ‘माऊ’चा आवाज. या कार्यक्रमाच्या मंचावर पहिल्यांदाच ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील माऊ बोलताना दिसली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आजवर प्रेक्षकांनी माऊ म्हणजेच साजिरीचा आवाज मालिकेत कधीच ऐकला नव्हता. अभिनेत्री दिव्या पुगावकर गेल्या दोन वर्षांपासून या मालिकेत काम करतेय. माऊ कधी बोलणार, तिचा आवाज कधी ऐकायला मिळणार, असा प्रश्न तिला सतत विचारला गेला. अखेर या प्रश्नाचं उत्तर माऊने तिच्या गोड आवाजात दिला आहे.
दिव्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण होता. आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमात तिची ढोल-ताशांच्या गजरात धमाकेदार एण्ट्री झाली. आई कुठे काय करते आणि मुलगी झाली हो या मालिकेतल्या कलाकारांनी तिचं जल्लोषात स्वागत केलं. मंचावर आलेल्या माऊचा आवाज पहिल्यांदा ऐकल्यानंतर मालिकेत विलास पाटील यांची भूमिका साकारणाऱ्या आनंद अलकुंटे यांच्या डोळ्यात अश्रू आले.
माऊ बोलायला लागल्याने ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा तिच सांभाळणार की काय, असा प्रश्न सिद्धार्थ जाधवला पडला. या कार्यक्रमामुळे साजिरीची बोलण्याची तर तिचा आवाज ऐकण्याची प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली. सोशल मीडियावरील या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.