बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने , अनुथ थापन याने काल ( बुधवार) पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली. मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी मोठा दावा केला आहे. अनुज याची कथितरित्या हत्या करण्यात आली आहे, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी लावला आहे. त्याने जेलमधील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले होते. जेलमधील चादरीचा वापर करून त्याने गळफास लावून घेतला अशी माहिती समोर आली आहे.
मृताच्या कुटुंबियांचं म्हणणं काय ?
रिपोर्ट्सनुसार, अनुजने आत्महत्या केली नाही, तर त्याची हत्या झाली आहे असा दावा त्याचा भाऊ अभिषेक याने केला आहे. ‘आम्ही गरीब कुटुंबातील आहोत. माझा भाऊ ट्रकवर मदतनीस म्हणून काम करायचा. त्याने जेलमध्ये आत्महत्या केली नाही, त्याचा खून झाला आहे. त्याला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. 6-7 दिवसांपूर्वी मुंबई पोलिस त्याला संगरूर येथून घेऊन गेले आणि आजा आम्हाला फोन आला की त्याने आत्महत्या केली. तो असा ( आत्महत्या करणारा) नव्हता. पोलिसांनी त्याची हत्या केली ‘ असा आरोप त्याच्या भावाने केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी मृताच्या गावचे सरपंच मनोजकुमार गोदरा म्हणाले की, हे प्रकरण सुरुवातीपासूनच संशयास्पद आहे. ते दोघे भाऊ, एक बहीण आणि आई असे रहात होते. त्याला वडील नाहीत. अनुज ट्रक ड्रायव्हरचा मदतनीस म्हणून काम करत होता… पंचायतीला सूचना न देताच, न कळवता मुंबई पोलिसां घेऊन गेले. 1-2 दिवसांनी कुटुंबीयांना कळवण्यात आले. पोलीस कोठडीत किती सुरक्षा असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे.” असे ते म्हणाले.
कुटुंबियांची मागणी
रिपोर्ट्सनुसार, अनुज थापनच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम व्हावे. हे शवविच्छेदन मुंबईबाहेर करावे, अशी त्याच्या कुटुंबियांची मागणी आहे. त्यांच्या छळामुळेच अनुजचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी पोलिसांवर केला आहे.
आधीच केली होती रेकी
मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्याआधीच शूटर्सनी चार वेळा सलमान खानच्या घराची रेकी केली होती. एवढंच नव्हे तर त्यांनी एकदा सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवरही पाळत ठेवली होती. मात्र बऱ्याच काळापासून सलमान फार्महाऊसवर आलाच नव्हता त्यामुळे हल्लेखोरांनी त्याच्या वांद्रे येथील घरावरच गोळीबार करण्याचा प्लान आखला. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल हे मुंबईत आल्यावर अज्ञात व्यक्तींकडून पुरवण्यात आले होते. तर खर्चासाठी लागणारे पैसेही अनोळखी व्यक्तीने दिले होते. त्याचबरोबर घर भाड्याने घेण्यासाठी अनोळखी व्यक्तीने मध्यस्थी केली होती. सलमान खानच्या घरावर गोळीबार होण्याच्या काही तास आधी शूटर्सना बंदूक पुरवण्यात आली होती. या बंदुकीचा पुरवठा 13 एप्रिलच्या रात्री वांद्रे भागात करण्यात आला आणि 14 एप्रिलच्या पहाटे दोन्ही शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला.