बिचुकले, तुम्ही ‘हिंदी बिग बॉस’मध्ये या, सलमान खानचं आमंत्रण
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना हिंदी बिग बॉसच्या तेराव्या पर्वात सहभागी होण्याचं आमंत्रण सुपरस्टार सलमान खानने दिलं आहे.
![बिचुकले, तुम्ही 'हिंदी बिग बॉस'मध्ये या, सलमान खानचं आमंत्रण बिचुकले, तुम्ही 'हिंदी बिग बॉस'मध्ये या, सलमान खानचं आमंत्रण](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2019/08/12120432/Abhijeet-Bichukale-Salman-Khan-Bigg-Boss-Marathi-2.jpg?w=1280)
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याने ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या सेटवर नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांना ‘हिंदी बिग बॉस’ (Bigg Boss 13) मध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण सलमानने दिलं. प्रत्यक्षात बिचुकलेंची हजेरी बिग बॉसच्या हिंदी आवृत्तीमध्ये लागते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
सलमान खानला पाहून बिग बॉसच्या घरातील स्पर्धक हरखून गेले होते. अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. यावेळी सर्वाधिक फूटेज खाल्लं ते अभिजीत बिचुकले यांनी. महेश मांजरेकर यांनी सर्व स्पर्धकांची ओळख सलमान खानला करुन दिली. त्यावेळी बिचुकलेंना पाहून मला स्वामी ओम याची आठवण होत असल्याचं सलमान म्हणाला.
तुम्ही फार कुरापती करु नका, बाहेर आल्यावर तुम्हाला मार पडेल, असं सलमानने बिचुकलेंना गमतीत म्हटलं. त्यावर बिचुकलेंनी आत्मविश्वासाने ‘आपल्याला मार नाही पडणार’, असं सांगितलं. त्यावर, स्वामी ओमलाही असंच वाटायचं, असं म्हणत सलमानने फिरकी घेतली.
सलमानच्या चित्रपटातील गाण्यांवर स्पर्धकांनी ताल धरला होता. ‘देखा है पहली बार, साजन की आँखो में प्यार’ हे गाणं एसपी बालसुब्रह्मण्यम यांच्या आवाजात गाऊन दाखवण्याचा अगोचरपणाही बिचुकलेंनी केला. त्याचवेळी सलमानने बिचुकले यांना हिंदी बिग बॉसच्या आगामी पर्वात येण्याचं आमंत्रण दिलं.
यापूर्वी, बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिलाही बिग बॉसच्या बाराव्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळाल्यास बिस बॉस हिंदीच्या आगामी पर्वात बिचुकले दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अभिजीत बिचुकले यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास अत्यंत रोचक राहिला आहे. खंडणी आणि चेक बाऊन्स प्रकरणात अडकल्यामुळे बिचुकलेंना सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या घरातूनच अटक केली होती. काही काळ कोल्हापुरातील कळंबा तुरुंगात घालवल्यानंतर बिचुकलेंची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी बिचुकलेंची पुन्हा स्पर्धेत एन्ट्री झाली.
शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचुकले यांनी अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिचुकलेंनी हीना पांचाळसोबत सुत जुळवल्याचं दिसत आहे. त्याशिवाय आरोह वेलणकर, नेहा शितोळे, वीणा जगताप यांच्यासोबत त्यांचे उडणारे खटकेही प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.
‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील धक्कादायक एलिमिनेशन्सचा सिलसिला सुरुच आहे. विजेतेपदाच्या शर्यतीत असलेला अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) बिग बॉसच्या घरातून बाद झाला. यापूर्वी वैशाली म्हाडे, माधव देवचके, रुपाली भोसले यांनी घराचा निरोप घेतला.
महेश मांजरेकर यांनी शनिवारच्या भागात अभिजित केळकरची शाळा घेतली होती. या संपूर्ण आठवड्यात अभिजीत नियमांनुसार खेळला नसल्याचं मांजरेकरांनी सांगितलं होतं. ‘चोरावर मोर’ या टास्कमध्ये अभिजीतने प्रतिस्पर्धी संघाला सहकार्य केलंच नाही. घरात फक्त तूच योग्य खेळतोस, असा तुझा समज आहे का? असं असेल तर तो समज खोटा आहे, असं म्हणत महेश मांजरेकरांनी अभिजीतची कानउघडणी केली होती.
‘बिग बॉस’च्या घरात उरलेल्या स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी गाठण्यासाठी चढाओढ सुरु आहे. आता वीणा जगताप, शिव ठाकरे, किशोरी शहाणे-वीज, नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले, हीना पांचाळ आणि आरोह वेलणकर हे आठ सदस्य आता खेळात राहिले आहेत.
ग्रँड फिनालेमध्ये किती स्पर्धकांचा समावेश होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही सहा स्पर्धकांचा समावेश महाअंतिम फेरीमध्ये होईल, अशी शक्यता प्रेक्षक वर्तवत आहेत.