मुंबई : सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात तो त्याच्या तिन्ही भावंडांच्या लग्नाच्या विरोधात असतो. भावंडांचं लग्न झालं तर कुटुंबातील नाती पहिल्यासारखी राहणार नाहीत, असं त्याचं म्हणणं असतं. त्यावरूनच सलमानला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भावंडांविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याचं उत्तर देताना ‘भाईजान’ त्याच्या भावंडांच्या घटस्फोटाची मस्करी करतो.
फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांनी सलमानच्या भावंडांच्या भूमिका साकारल्या आहेत. मोठा भाऊ लग्न करत नाही म्हणून हे तिघे छोटे भाई अविवाहित असतात. त्याचं लग्न जमलं की आम्हीसुद्धा आमच्या प्रेयसीसोबत लग्न करण्यास मोकळे, असा त्यांचा विचार असतो. म्हणून त्याच्या लग्नासाठी ते विविध युक्त्या लढवतात.
सलमानने नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कपिलने सलमानच्या रिल आणि रिअल लाईफमधील या योगायोगाबद्दल मजेशीर प्रश्न विचारला. “सोहैल आणि अरबाजने तुझ्याकडे अशी कधी तक्रार केली का की तू आमचं कधी ऐकत नाहीस, पण आता त्यांचं (चित्रपटातील भावंडांचं) ऐकतोय.” त्यावर सलमान म्हणतो, “त्यांनी माझं कधीच ऐकलं नाही. आता ते माझं ऐकू लागले आहेत.” सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Bhoi joking about his brothers getting divorced
by u/HardTune272 in BollyBlindsNGossip
अरबाज खानने अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान खान हा मुलगा आहे. अरहान सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे. सलमानचा दुसरा भाऊ सोहैल खानने 1998 मध्ये सीमा सजदेहशी लग्न केलं होतं. हे दोघंसुद्धा गेल्या वर्षी विभक्त झाले. सोहैल आणि सीमाला निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत.
सलमान खानने याआधी संगीता बिजलानी, सोमी अली आणि ऐश्वर्या राय यांना डेट केलं होतं. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने मुलाला दत्तक घेण्याविषयी वक्तव्य केलं होतं. भारतातील नियमांमुळे मुलगा दत्तक घेण्यास अडचण येत असल्याचं सलमानने सांगितलं. सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई केली. यानंतर त्याचा ‘टायगर 3’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो कतरिना कैफसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.