Salman Khan : सलमान खान धमकी प्रकरण, गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या चौकशीसाठी मुंबई पोलिस दिल्लीत दाखल
दिल्ली पोलिसांनी सोमवारी बिष्णोईची चौकशी केली. मात्र, या प्रकरणात आपला हात नसल्याचं त्याने म्हटलंय. तसंच हे पत्र कुणी लिहिलं याची माहिती नाही, असंही बिष्णोई म्हणाला आहे. असं असलं तरी मुंबई पोलिसांचं एक पथक आज दिल्लीत दाखल झालं आहे.
मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळाल्यानं कलाविश्वास भीतीचं वातावरण पसरलं आहे. सोमवारी सलमान खानने आपला जबाब पोलिसांकडे नोंदवला आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या चौकशीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. सलमान खान धमकी प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी सोमवारी बिष्णोईची चौकशी केली. मात्र, या प्रकरणात आपला हात नसल्याचं त्याने म्हटलंय. तसंच हे पत्र कुणी लिहिलं याची माहिती नाही, असंही बिष्णोई म्हणाला आहे. असं असलं तरी मुंबई पोलिसांचं एक पथक आज दिल्लीत दाखल झालं आहे.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात बिष्णोई गँगचा सहभाग असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच सलीम खान मॉर्निंग वॉकला गेले असता ते बसतात त्या बाकड्याजवळ धमकीचं पत्र त्यांच्या बॉडिगार्डला मिळालं. त्यात सलमान आणि सलीम खान यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सलमान आणि सलीम खान यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी संशयाची सुई बिष्णोई गँगकडे वळत असल्याने दिल्ली पोलिसांनी ताब्यात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची चौकशी केली. मात्र, त्याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचं उत्तर त्याने दिल्ली पोलिसांना दिलं आहे.
सलमान खानचा जबाब नोंदवला
जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर सलमान खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याला कुणावर संशय आहे का, याआधी त्याला अशी धमकी कधी आली होती का असे प्रश्न त्याला विचारण्यात आले. मात्र, त्याने पोलिसांना काय जबाब दिला ते समोर आलं नाही. धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्याच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सलमानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जावून आढावा घेतला होता.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. महत्वाची बाब म्हणजे तिथूनच तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. लॉरेन्स हा पंजाबच्या फजिल्ला इथल्या अबोहर भागात राहणारा आहे. 2018 मध्ये त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली, तेव्हा तो देशभरात चर्चेत आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या गँगशी संबंधित काही शूटर्सना अटक केली होती. लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या निवडणुकीत सहभागी झाला होता. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याच्या गुन्हेगारीला सुरुवात झाली. त्याच्याविरोधात 50 पेक्षा जास्त लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.