31 वर्षांनी लहान रश्मिकासोबत रोमान्स करण्याबद्दल सलमान म्हणाला, “तिच्या मुलीसोबतही..”

| Updated on: Mar 24, 2025 | 9:59 AM

सलमान खानचा बहुचर्चित 'सिकंदर' हा चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो पहिल्यांदाच अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. रश्मिका ही सलमानपेक्षा वयाने 31 वर्षांनी लहान आहे.

31 वर्षांनी लहान रश्मिकासोबत रोमान्स करण्याबद्दल सलमान म्हणाला, तिच्या मुलीसोबतही..
Salman Khan and Rashmika Mandanna
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘सिकंदर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. रविवारी मुंबई या ट्रेलर लाँचचा भव्य कार्यक्रम पार पडला. या चित्रपटात सलमानसोबत पहिल्यांदाच अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. या दोघांच्या वयात बरंच अंतर आहे. एकीकडे सलमान 59 वर्षांचा आहे तर रश्मिका 28 वर्षांची आहे. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात सलमानला याविषयी आवर्जून प्रश्न विचारण्यात आला. 31 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याबाबत एकाने सलमानला सवाल केला. त्यावर सलमानने त्याच्याच ‘दबंग’ अंदाजात उत्तर दिलं. रश्मिका काय तर भविष्यात तिच्या मुलीसोबतही काम करणार, असं तो म्हणाला.

रश्मिकासोबत काम करण्याबद्दल सलमान पुढे म्हणाला, “जर हिरोइनला काही समस्या नाही तर मग तुम्हाला का समस्या आहे? तिचं लग्न होईल, तिला मुलगी झाली की तिच्यासोबतही काम करेन. आईची परवानगी तर मिळेलच ना?” यावेळी सलमानने रश्मिकाच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं. “एकाच वेळी ती ‘पुष्पा 2’ आणि ‘सिकंदर’ या दोन मोठ्या चित्रपटांसाठी शूटिंग करत होती. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ती ‘पुष्पा 2’चं शूटिंग करायची. त्यानंतर ती ‘सिकंदर’च्या सेटवर रात्री 9 वाजता यायची आणि आमच्यासोबत पहाटे 6.30 पर्यंत शूटिंग करायची. असं तिचं शेड्युल होतं. पायाला दुखापत झाल्यानंतरही तिने एकाही दिवसाचं शूटिंग रद्द केलं नव्हतं. कामाप्रती तिची निष्ठा पाहून मला माझ्या तरुणपणाची आठवण झाली,” असं सलमान म्हणाला.

हे सुद्धा वाचा

‘सिकंदर’ या चित्रपटात सलमान आणि रश्मिकासोबतच काजल अग्रवाल, सत्यराज, सुनील शेट्टी, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर यांच्याही भूमिका आहेत. आमिर खानच्या ब्लॉकबस्टर ‘गजिनी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. 2023 मध्ये सलमानचा ‘टायगर 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्याच्या ‘सिकंदर’ची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.

रश्मिका ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने 2022 मध्ये ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा तिचा पहिला चित्रपट विशेष गाजला नव्हता. मात्र त्यानंतर ती रणबीर कपूरसोबत ‘ॲनिमल’ आणि विकी कौशलसोबत ‘छावा’ या चित्रपटात झळकली. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले.