अभिनेता सलमान खानने पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खानने गेल्या वर्षी त्याच्या युट्यूब चॅनलवर ‘डंब बिर्याणी’ नावाने पॉडकास्टची सुरुवात केली. त्याच पहिल्यांदाच ‘भाईजान’ पाहुणा म्हणून पोहोचला. या मुलाखतीत सलमानने विमानप्रवासातील एक प्रसंग सांगितला. भाऊ सोहैल खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत परदेशातून येताना मृत्यूच्या दाढेतून परतल्याचा खुलासा सलमानने केला. हे तिघं एका पुरस्कार सोहळ्यासाठी परदेशात गेले होते.
पुरस्कार सोहळ्यातून परत येताना विमानप्रवासादरम्यान पाच-सात मिनिटांसाठी नाही तर तब्बल 45 हून अधिक मिनिटांसाठी टर्ब्युलन्स जाणवल्याचं सलमानने सांगितलं. त्यावेळी सर्व प्रवासी घाबरले होते, मात्र सोहैल खान बिनधास्तपणे झोपी गेला होता.
“श्रीलंकेत पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यानंतर आम्ही परत येत होतो. प्रवासादरम्यान आम्ही मजामस्करी करत होतो. अचानक आम्हाला विमानात टर्ब्युलन्स (खराब वातावरणामुळे विमानात अस्थिरता जाणवणे) जाणवू लागला. सुरुवातीला आम्हाला ते सर्वसामान्य वाटलं होतं. पण हळूहळू हवेचा आवाज वाढू लागला आणि विमानातील सर्वजण एकदम गप्प झाले. सोहैल आणि मी एकाच विमानात होतो. जेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा तो झोपला होता. पुढील 45 मिनिटांपर्यंत टर्ब्युलन्स जाणवत राहिला”, असं सलमानने सांगितलं.
याविषयी तो पुढे म्हणाला, “मी एअरहॉस्टेसकडे पाहिलं, तेव्हा ती प्रार्थना करू लागली होती. तेव्हा मला अजून भीती वाटू लागली होती. पायलटसुद्धा तणावात दिसले होते. एरव्ही त्यांना परिस्थितीची जाणीव असते, त्यामुळे ते निवांत असतात. त्यानंतर ऑक्सिजन मास्क खाली आले आणि मी विचार करू लागलो की, मी आतापर्यंत हे सर्व फक्त चित्रपटांमध्येच पाहिलं होतं. 45 मिनिटांनंतर हळूहळू विमान स्थिर झालं तेव्हा प्रत्येकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. हळूहळू पुन्हा हसणं, मस्करी करणं चालू झालं. सोनाक्षी सिन्हा आणि तिची आईसुद्धा विमानात होती. पण पुन्हा काही वेळाने टर्ब्युलन्स सुरू झाला. पुन्हा दहा मिनिटांपर्यंत टर्ब्युलन्स जाणवू लागलं होतं आणि सर्वजण चिडीचूप झाले होते. विमान सुरक्षित लँड होईपर्यंत कोणीच एका शब्दाने काही बोललं नाही.”
पुतण्याच्या या पॉडकास्टमध्ये सलमान इतरही अनेक मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाला. त्याने अरहान आणि त्याच्या मित्रांना रिलेशनशिप आणि आयुष्याबद्दल मोलाचा सल्लासुद्धा दिला.