हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच समस्यांचा सामना करतेय. घटस्फोटानंतर समंथा मायोसिटिस या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त झाली. या आजारामुळे ती शारीरिक आणि मानसिकरित्या खूप खचली. मात्र त्यातून बरी होत ती पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. अशातच एका प्रसिद्ध निर्मात्याने समंथाचं फिल्मी करिअर संपल्याचा दावा केला आहे. तिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. मात्र एकंदरीत आता समंथाचा स्टारडम पहिल्यासारखा राहिलेला नाही, असं त्या निर्मात्याने म्हटलंय.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक त्रिपुरानेनी चिट्टीबाबू यांनी समंथाच्या बाबत धक्कादायक दावा केला आहे. समंथाचं फिल्मी करिअर संपुष्टात आलं आहे, आता तिला पुन्हा पहिल्यासारखं स्टारडम मिळणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. चिट्टी बाबू यांनी हा दावा समंथाने ज्या प्रकारे चित्रपटाचं प्रमोशन केलं, त्यावरून केला आहे. आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी ती आजारपणाचा आधार घेतेय, असंही त्यांनी म्हटलंय.
“हे सर्व खोटं आहे. शकुंतला साकारण्यासाठी खूप काही सहन केल्याचं समंथाने सांगितलं. पण प्रत्येक कलाकाराला हे सहन करावंच लागतं. त्यांनी भूमिका आत्मसात करण्यासाठी मेहनत करावीच लागते. यशोदाच्या प्रमोशनदरम्यानसुद्धा हेच घडलं. हा फक्त तिचा सहानुभूती मिळवण्याचा एक मार्ग आहे. पण हे योग्य नाही. मेहनत करणं हा तुमच्या नोकरीचा एक भाग आहे. आम्ही असं बऱ्याच कलाकारांना पाहिलंय, जे भूमिकेसाठी कोणतीही हद्द पार करू शकतात. मात्र समंथाने आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. ही फार स्वस्त पब्लिसिटी आहे”, अशी टीका त्यांनी केली.
समंथाच्या करिअरविषयी ते पुढे म्हणाले, “समंथाचं वजन कमी झालंय आणि तिचा चेहरासुद्धा बदलला आहे. ती आता आजारी आहे आणि चित्रपट चालण्यासाठी ड्रामा करतेय. प्रत्यक्षात तिचं करिअर संपुष्टात आलं आहे. सोशल मीडियावर जे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ते सर्व पब्लिसिटीसाठी होते. असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी आजारपणात काम केलंय. मात्र त्याचा उपयोग त्यांनी प्रसिद्धीसाठी केला नाही. समंथाने तिचं नाव आणि स्टारडम गमावलंय. ती एक सुपरस्टार होती आणि करिअरमध्ये तिने यशाचं शिखर गाठलं होतं. मात्र आता केवळ प्रसिद्धीसाठी ती तिच्या आजारपणाचा वापर करतेय. लोक भावनांनी प्रभावित होऊन चित्रपट पहायला जात नाहीत.”