“मी सूड घेण्यासाठी.. “; लग्नाच्या गाऊनवर कात्री चालवण्याबद्दल समंथा स्पष्टच म्हणाली..

| Updated on: Nov 26, 2024 | 11:00 AM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर लग्नाची खास आठवण पुसून टाकली होती. अभिनेता नाग चैतन्यसोबत लग्न करताना समंथाने जो गाऊन परिधान केला होता, त्याला तिने नवीन टच दिला होता.

मी सूड घेण्यासाठी.. ; लग्नाच्या गाऊनवर कात्री चालवण्याबद्दल समंथा स्पष्टच म्हणाली..
Samantha and Naga Chaitanya
Image Credit source: Instagram
Follow us on

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यावरून अनेकदा सोशल मीडियावर टीका-टिप्पण्या केल्या जातात. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला घटस्फोटानंतर बऱ्याच नकारात्मकतेचा सामना करावा लागला होता. लग्नाच्या चार वर्षांनंतर समंथा आणि नाग चैतन्यने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. 2021 मध्ये ते अधिकृतरित्या विभक्त झाले. या घटस्फोटानंतर ट्रोलर्सकडून समंथावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “जेव्हा एखादी स्त्री घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात असते, तेव्हा तिच्यावर लज्जास्पद टीका केली जाते, तिला कलंक लावला जातो”, असं समंथा म्हणाली.

‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत समंथा याविषयी पुढे म्हणाली, “माझ्यावर लोकांनी अत्यंत वाईट कमेंट्स केले. सेकंड हँड, आयुष्य उद्ध्वस्त करून बसलेली स्त्री.. अशा अत्यंत खालच्या पातळीच्या टीका माझ्यावर करण्यात आल्या होत्या. ही नकारात्मकता इतकी वाढत जाते की एका टप्प्यावर तुम्हाला स्वत:विषयी काहीच चांगलं वाटत नाही. तुम्ही आयुष्यात अपयशी ठरल्याची भावना मनात येते. तुम्ही एकेकाळी लग्न केलं होतं आणि आता तुम्ही विवाहित नाही, याबद्दल तुमच्या मनात अपराधीपणाची भावना आणली जाते. अशा परिस्थितीतून गेलेल्या कुटुंबांसाठी आणि मुलींसाठी हे खरोखर कठीण असू शकतं.”

हे सुद्धा वाचा

काही महिन्यांपूर्वी समंथाने तिच्या लग्नाच्या गाऊनला कात्री लावत त्यापासून नवीन ड्रेस बनवला होता. नाग चैतन्यसोबतच्या ख्रिश्चन लग्नात समंथाने जो गाऊन परिधान केला होता, त्याला तिने वेगळं रुप दिलं होतं. यामागील कारण समंथाने या मुलाखतीत सांगितलं. “मी असं का केलं यामागचं कारण म्हणजे मला खरंच त्या गाऊनला एक वेगळं रुप द्यायचं होतं आणि सुरुवातीला मला त्रास नक्की झाला होता. मला वेदना जाणवत होत्या पण मी त्यापासून नवीन काहीतरी बनवण्याचा निर्णय घेतला. होय, मी विभक्त झाले आहे आणि माझा घटस्फोट झाला आहे. गोष्टी परीकथेसारख्या नाहीत पण याचा अर्थ असा नाही की एका कोपऱ्यात बसून त्याबद्दल रडत बसावं आणि आयुष्यात पुन्हा कधीच आनंदाने जगू नये”, असं समंथा म्हणाली.

“लग्नाच्या गाऊनला कात्री लावून त्यापासून वेगळा ड्रेस बनवण्यामागे काही सूड वगैरे नव्हता. ही काही फार मोठी गोष्ट नाही. जरी ती तितकी मोठी वाटत असली तरी ती नाही. त्याचा अर्थ असा होता की होय, जे घडायचं होतं ते घडून गेलंय आणि मी ते लपवण्याचा प्रयत्न करत नाहीये. इतकंच आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की माझं आयुष्य तिथेच संपतंय. जिथे गोष्टी संपल्या तिथून एक वेगळं आयुष्य सुरू होतंय. मी सध्या खूप खुश आहे. माझ्यात बरेच सकारात्मक बदल झाले आणि मी खूप चांगले प्रोजेक्ट्स करतेय. माझ्या आयुष्यातील पुढच्या टप्प्यासाठी मी खूपच उत्सुक आहे”, अशा शब्दांत समंथाने भावना व्यक्त केल्या आहेत.