जालन्याचा संकल्प काळे ठरला ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2’चा महाविजेता

| Updated on: Oct 09, 2023 | 10:43 AM

छोट्या उस्तादांना या पर्वात सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. सिद्धार्थ जाधवने या सोहळ्यात धमाकेदार गाणं सादर करुन सर्वांनात आश्चर्यचकीत केलं.

जालन्याचा संकल्प काळे ठरला मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2चा महाविजेता
Sankalp Kale
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. संकल्प काळे, श्रुती भांडे, श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली होती. अटीतटीच्या या लढतीत जालन्याच्या संकल्प काळेनं बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर अकोल्याची श्रुती भांडे या शोची उपविजेती ठरली. नाशिकच्या सृष्टी पगारेनं तृतीय क्रमांक पटकावला. तर श्रेया गाढवे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर यांना त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी गौरवण्यात आलं. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2’चा विजेता संकल्प काळेला बक्षीस म्हणून चार लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना संकल्प काळे म्हणाला, “मी आजवर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. मात्र छोटे उस्तादच्या मंचाने मला संधी दिली आणि मला माझं गायनकौशल्य सादर करता आलं. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल मी आभारी आहे. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं.”

हे सुद्धा वाचा

पहिल्या पर्वाप्रमाणेच ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’च्या दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून 6 सर्वोत्तम स्पर्धकांनी महाअंतिम फेरी गाठली होती. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 2’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा 7 आणि 8 ऑक्टोबरला पार पडला.

जालन्याचा संकल्प काळे, अकोल्याची श्रुती भांडे, नाशिकची श्रेया गाढवे आणि सृष्टी पगारे, औरंगाबादची रागिणी शिंदे आणि भिवंडीचा काव्य भोईर या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगली होती. महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके गायक अर्थातच रोहित राऊत, जुईली जोगळेकर, उर्मिला धनगर, प्रसेनजीत कोसंबी, मधुरा कुंभार, आणि शरयू दाते यांनी खास हजेरी लावली होती.