हरयाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) गेल्या काही दिवसांपासून फसवणूक प्रकरणामुळे चर्चेत आहे. सपनाला आज (सोमवारी) लखनऊ उच्च न्यायालयासमोर (Lucknow High Court) हजर केलं असता न्यायालयाने तिला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सपनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी आता तिने न्यायालयात हजर राहून आत्मसमर्पण केल्याचं वृत्त आहे. कोर्टाने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर तिने कोर्टासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मात्र आत्मसमर्पण केल्यानंतर काही वेळातच न्यायालयाने सपनाचं वॉरंट मागे घेतलं.
1 मे 2019 रोजी सपनाविरोधात विश्वासभंग आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 20 जानेवारी 2019 रोजी सपनासह 5 जणांविरुद्ध या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
सपनाने डान्स शोसाठी पैसे घेतले, मात्र ऐनवेळी ती शोसाठी हजरच राहिली नाही, असा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी कार्यक्रमाच्या आयोजकांनी सपनाविरोधात लखनऊच्या आशियाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.
हे प्रकरण 13 ऑक्टोबर 2018 चं आहे. त्यावेळी आशियाना इथल्या एका क्लबमध्ये सपनाचा डान्स शो आयोजित करण्यात आला होता. शोची तिकिटं ऑनलाइन आणि ऑफलाइन विकली गेली होती.
13 ऑक्टोबर 2018 रोजी स्मृती उपवन याठिकाणी दुपारी 3 ते 10 या वेळेत नृत्याचा कार्यक्रम होणार होता आणि या कार्यक्रमाची तिकिटं 300 रुपये दराने ऑनलाइन आणि ऑफलाइन विकली गेली होती. ऐनवेळी सपना चौधरी कार्यक्रमाला न आल्याने आणि त्यांचे पैसेही परत न दिल्याने कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी गोंधळ घातला होता.