मुंबई : 4 डिसेंबर 2023 | ‘साराभाई वर्सेस साराभाई’ ही मालिका टेलिव्हिजनवर प्रचंड गाजली. यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. याच मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्याने काम मिळत नसल्याने अभिनय क्षेत्र सोडलंय आणि शेतीची वाट धरली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे राजेश कुमार. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत त्याने रोसेशची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजेशने अभिनय क्षेत्र सोडण्यामागचं कारण सांगितलं. ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटानंतर तो शेतीकडे वळला. या चित्रपटासाठी 15 ते 16 दिवसांपर्यंत शूटिंग करूनही फायनल कटदरम्यान माझे बरेच सीन्स कापण्यात आले, अशी तक्रार त्याने या मुलाखतीत बोलून दाखवली.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश म्हणाला, “स्टुडंट ऑफ द इअर 2 या चित्रपटानंतर मी पाच वर्षे शेतात काम केलं. मला त्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण जितकं शूट झालं होतं आणि जितकं दाखवलं, त्यात खूप फरक होता. त्यामुळे चित्रपटातील माझ्या भूमिकेला ओळखच मिळाली नाही. शूटिंग मात्र बरंच झालं होतं. जर तुम्ही एखाद्या चित्रपटासाठी पंधरा ते सोळा दिवस काम करत असाल, तर तुमची भूमिका बरीच महत्त्वाची आहे. मग त्यात तुमची उपस्थिती असो किंवा तुम्हाला डायलॉग मिळाले असतील किंवा तुमचे सीन्स असो.. पण चित्रपटातील सीन्सवर अशी कात्री चालवली की फक्त क्रू कट केसच उरले होते.”
टीव्ही इंडस्ट्री आणि अभिनयविश्वातील कामाला कंटाळून शेतीकडे वळल्याचं राजेशने सांगितलं. मात्र शेतात काम करताना राजेशने काही वर्षांतच जमा केलेली बरीच रक्कम गमावली. या निर्णयामुळे दिवाळखोरीत आल्याचं त्याने सांगितलं. ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मध्ये तारा सुतारिया, अनन्या पांडे आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. राजेशने मिसेस अँड मिस्टर शर्मा अलाहाबादवाले, बा बहु और बेबी यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.