मुंबई | सारेगमप मराठीचं लिटिल चॅम्पसचं पहिलं पर्व खूप गाजलं होतं. पहिल्या पर्वातील रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या सर्वांना उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. या लिटील चॅम्पसनी आपल्या गोड आवाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या पंचरत्नांनी चाहत्यांची गोड आवाजाने मनं जिंकली. सारेगमप मराठी लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम सॉल्लिड लोकप्रिय ठरलेला. या कार्यकर्मातील पहिल्या पर्वातील पंचरत्न आजही महाराष्ट्राचे लाडके आहेत. तेव्हा स्पर्धकाच्या भूमिकेत असलेल्या या पंचरत्नांनी आता यशाची शिखरं पादक्रांत केली आहेत. या पंचरत्नापैकी कार्तिकी गायकवाड आणि रोहित राऊत या दोघांचंही लग्न झालंय. त्यानंतर आता आणखी एक लिटिल चॅम्पने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
‘मोदक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रथमेश लघाटे याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. प्रथमेशने फेसबूक पोस्ट करत आमचं ठरल्याचं जाहीर केलंय. प्रथमेशचे अखेर सूर जुळलेत. प्रथमेशने मॉनिटर अर्थात मुग्धा वैंशपायन हीच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याचं फेसबूक पोस्ट करत जाहीर केलंय. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. तसेच या दोघांचं अभिनंदन केलं जात आहे.
प्रथमेशकडून प्रेमाची कबुली
सारेगमप लिटील चॅम्पपासून सुरु झालेला प्रवास आता रिलेशनपर्यंत येऊन पोहोचला आहे. आपल्या सुरेल आवाजाने घरोघरी पोहोचलेल्या दोन सूरवीरांनी एकमेकांचा पार्टनर म्हणून स्वीकार केला आहे. या दोघांच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान काहीच दिवसांपूर्वी अलिबागकर मुग्धाने एम ए शास्त्रीय संगीतात (क्लासिक व्होकल) पदवी मिळवली. विशेष बाब म्हणजे मुग्धाने सुवर्ण पदकासह पदवी मिळवली. मुग्धाने इंस्टाग्राम पोस्ट करत ही गूडन्युज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती.
मुग्धाने तिच्या या यशाचं सर्व श्रेय हे तिच्या मार्गदर्शिका डॉ अनाया थत्ते आणि गुरु शुभदा पराडकर यांनं दिलं होतं. मुग्धाच्या या सुवर्ण कामगिरीसाठी तिचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक करण्यात आलं होतं. मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनीही मुग्धाचं या कामगिरीसाठी अभिनंदन केलं होतं.