अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर; डॉक्टर काय म्हणाले ?
आपल्या खणखणीत अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली
आपल्या खणखणीत अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखू लागल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता शिंदे यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आता डॉक्टरांनी दिली आहे.
डॉक्टर काय म्हणाले ?
सयाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी छातीमध्ये थोडा त्रास झाल्यासारखं जाणवत होतं. त्यामुळे त्यांनी क्लिनिकमध्ये येऊन रूटीन म्हणून काही तपासण्या केल्या होत्या. तेव्हा ईसीजीमध्ये मायनर चेंजेस सापडले. त्यांची 2D इको कार्डिओग्राफी केली तेव्हा हृदयाच्या एका छोट्याशा भागाची हालचाल थोडी कमी होती असं जाणवत होतं. त्यानंतर त्यांची स्ट्रेस टेस्ट केल्यावर त्यामध्ये थोडे, छोटेसे दोष सापडले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
कधी केली जाते अँजिओप्लास्टी ?
काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावरही अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
जेव्हा एखाद्या रुग्णाला हार्ट ॲटॅक येतो आणि आणि अवरोधित धमन्या उघडण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. हृदयाच्या धमनीत ब्लॉकेज असल्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही. आणि अशा वेळी हार्ट ॲटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हेच ब्लॉकेज हटवण्यासाठी रुग्णावर अँजिओप्लास्टी केली जाते.