मुलगा, पत्नी, कुटुंबाला पाहून कारागृहात बड्या स्टारला रडू आवरेना, या प्रकरणात झाली आहे अटक
दर्शन याचा चाहता असलेल्या रेणुकास्वामी याने पवित्रा गौडा यांना सोशल मीडियावर अपमानास्पद संदेश पाठवला. तसेच, त्याने खंडणी मागितली होती. त्याच्यामागील ससेमिरा टाळण्यासाठी दर्शन याने त्याच्या हत्येची सुपारी दिली होती.
तुरुंगात असलेला कन्नड सुपरस्टार दर्शन याची आई, भाऊ, पत्नी आणि मुलगा यांनी बेंगळुरू शहराच्या बाहेरील परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात भेट घेतली. यावेळी घरच्यांना भेटल्यानंतर दर्शन याला रडू कोसळले. सोमवारी सकाळी दर्शन याची आई मीना, भाऊ दिनकर, पत्नी विजयालक्ष्मी आणि मुलगा विनिश हे त्याला भेटायला आले. यावेळी दर्शन आणि त्याची आई भावुक झाले. दर्शनाच्या भावाने दोघांचे सांत्वन केले. मात्र, या भेटीमुळे दर्शनच्या कुटुंबीयांना प्राधान्याने भेटू देण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे.
कन्नड अभिनेता दर्शन ठगदीप याच्यावर त्याचा चाहता रेणुकास्वामी याच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दर्शन याने त्याच्या चाहत्याची हत्या केली होती. जून महिन्यात त्याला अभिनेत्री पवित्रा गौडा हिच्यासोबत अटक करण्यात आली होती. रेणुकास्वामी हा चित्रदुर्ग येथील रहिवासी होता. 33 वर्षीय रेणुकास्वामी यांच्या हत्येप्रकरणी दर्शन, त्याची मैत्रिण पवित्रा गौडा आणि अन्य 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
दर्शन याचा चाहता असलेल्या रेणुकास्वामी याने पवित्रा गौडा यांना सोशल मीडियावर अपमानास्पद संदेश पाठवला. तसेच, त्याने खंडणी मागितली होती. त्याच्यामागील ससेमिरा टाळण्यासाठी दर्शन याने त्याच्या हत्येची सुपारी दिली होती. रेणुकास्वामी याचे आधी अपहरण करण्यात आले. अपहरण करून त्याला बेंगळुरू येथे आणले. तेथे एका शेडमध्ये त्याला ठेवून छळ करून नंतर त्याची हत्या करण्यात आली.
पोलीस तपासामध्ये या हत्येचे कनेक्शन अभिनेता दर्शन याच्यापर्यंत जाऊन पोहोचले. पोलिसांनी दर्शन याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दर्शन याला चार जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. दर्शन याला अटक केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबीयांनी त्याची तुरुंगात जाऊन भेट घेतली. यावेळी कुटुंबाला पाहून दर्शन भावूक झाला होता.