अभिनेता शाहरुख खानकडे 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. रायपूरमधून अटक करण्यात आलेला वकील फैजान खान याची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीदरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. शाहरुखचे सुरक्षा कर्मचारी आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांच्याविषयी वकिलाने तपशीलवार माहिती गोळा केल्याचं उघड झालंय. आरोपीने शाहरुखची सुरक्षा आणि आर्यनच्या हालचालींबद्दल सविस्तरपणे शोध घेत ही सर्व माहिती ऑनलाइन गोळा केली. आरोपीच्या ताब्यातून सापडलेल्या आणखी एक मोबाईल तपासणीत हा प्रकार उघडकीस आला.
आरोपीच्या मोबाइल फोनच्या ब्राऊझिंग हिस्ट्रीमध्ये शाहरुखच्या सुरक्षेशी संबंधित आणि आर्यन खानविषयी तपशीलवार सर्च केल्याचं दिसलंय. मात्र ही माहिती त्याने का गोळा केली याचं समाधानकारक उत्तर आरोपी पोलिसांना देऊ शकला नाही, अशी माहिती वांद्रे पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जस्ट डायलवरून वांद्रे पोलीस ठाण्याचा लँडलाइन नंबर मिळवला आणि नंतर धमकीचा कॉल केला.
धमकीचा कॉल करण्यासाठी जो मोबाइल फोन वापरण्यात आला होता, तो 30 ऑक्टोबर रोजी म्हणजेच धमकीचा कॉल करण्याच्या एक आठवड्याआधीच खरेदी करण्यात आला होता, असं पुढील तपासादरम्यान स्पष्ट झालं. फैजान खानने स्वत: हा फोन विकत घेतला होता आणि त्यात त्याचा जुना सिम कार्ड टाकून तो फोन वापरत होता. तरीही त्याने 2 नोव्हेंबर रोजी फोन चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्याने फोनमधील सिम कार्ड डिॲक्टिव्हेट केला नव्हता. जर तो फोन खरंच चोरीला गेला असता तर चोराने फोनमधील सिम कार्ड बदलला असता. पण याप्रकरणी असं काहीच झालं नसल्याचं, पोलीस म्हणाले. इतकंच नव्हे तर आरोपीने त्या फोन नंबरवर कॉल करून माहिती मिळवण्याचा कोणताच प्रयत्न केला नव्हता.
मोबाइल फोन विकत घेतल्यानंतर आरोपीने त्यातून अनेक कॉल्स केल्याचंही कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झालं. 31 ऑक्टोबर रोजी त्याने रात्री 11.27 वाजता 107 सेकंदांचा एक कॉल केला होता. त्यानंतर रात्री 11.30 वाजता 125 सेकंदांचा आणि 11.53 वाजता 38 सेकंदांचा कॉल केला होता. 1 नोव्हेंबर रोजी आरोपीने दुपारी 2.24 वाजता 379 सेकंदांचा, 2.57 वाजता 69 सेकंदांचा, 3 वाजता 395 सेकंदांचा आणि रात्री 9.22 वाजता 157 सेकंदांचा कॉल केला होता. हा कॉल त्याने कोणाला केला आणि त्यावर काय बोलणं झालं याविषयी आरोपीने कोणतंच स्पष्टीकरण दिलं नाही. आरोपीने जाणूनबुजून तो फोन लपवला होता, असा संशय पोलिसांना आहे.