Shah Rukh Khan | गडगंज संपत्ती, ऐशो आराम, पण एका घटनेने शाहरुख खान कोलमडला; काय घडलं होतं असं ?
शाहरुख खानने आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. त्याला जे यश मिळालं, त्याचं सर्वांना अप्रूप वाटतं, पण हे यश पहायला आई-वडील जवळ हवे होते, अशी खंत त्याला नेहमीच वाटते. त्याचे आई-वडील, शाहरूख आणि त्याच्या बहीणीला खूप लवकर सोडून गेले.
मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणारा, रोमान्सचा बादशहा, किंग खान शाहरूख खान ( Shah Rukh khan) … त्याच्यासारखं आयुष्य असावं, लोकप्रियता, पैसा, प्रसिद्धी , पॉवर… सगळं, सगळं मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मनातल्या मनात सगळेजण तीच ‘मन्नत’ मागत असतात. पण संपूर्ण जगावरल, लोकांच्या हृदयावर अधिराज्य करणाऱ्या, शाहरूखच्या या चमचमणाऱ्या चेहऱ्यामागे काही दु:खही लपलं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? मात्र त्याच दु:खातून बाहेर पडण्याची कलाही त्यालाच अवगत आहे. गडगंज संपत्ती, ऐशो आराम, सगळ सुख पायाशी लोळण घेतयं, असं असतानााही शाहरुखच्या आयुष्यात असं काय झालं होतं , ज्यामुळे तो कोलमडला होता. चला जाणून घेऊया.
एका जुन्या मुलाखतीत शाहरुखने सांगितलं होतं की तो त्याच्या दुःखावर मात करण्यासाठी चित्रपटात काम करतो. चित्रपट बनवणे आणि त्यात अभिनय करणे हाच त्याचं दुःख दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे. माझ्या आई-वडिलांची अनुपस्थिती हीच माझ्या आयुष्यातील एकमेव आणि मोठी समस्या आहे, असं सांगत शाहरुखने त्याची व्यथा मांडली होती.
लहान वयातच सहन करावा लागला आई-वडिलांचा विरह
तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण शाहरूखच्या वडिलांचे वयाच्या 52 व्या वर्षीच निधन झालं. तेव्हा तर शाहरूख टीनेजर होता. त्यानंतर काही वर्षांनी त्याची आईदेखील त्यांना सोडून गेली. वडिलांप्रमाणेच त्याच्या आईचेही 52 व्या वर्षी निधन झालं. एकामागोमाग झालेल्या या आघातामुळे शाहरुखची मनस्थिती अतिशय विचित्र झाली होती. ‘The Inner World of Shah Rukh Khan ‘ या डॉक्यूमेंट्रीमध्येही शाहरूख त्याच्या आई-बाबांबद्दल बरंच काही बोलला आहे.
बहिणीची अवस्थाही झाली होती बिकट
आई-वडिलांचे निधन झाले तेव्हा शाहरुख खानची बहीण त्याच्यासोबत राहायची. आपल्या बहिणीबद्दल बोलताना त्याने सांगितले होते की त्याची बहीण खूप हुशार विद्यार्थी आहे. ती एक प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञही (psychologist) आहे. पण, दुर्दैवाने तिची प्रकृती ठीक नाही. आई-वडीलांच्या जाण्याचा तिच्यावरही खूप परिणाम झाला. शाहरुखच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. आई-वडिलांना गमावणं काय असतं याची अगदी लहान वयातच कल्पना आल्यामुळे शाहरुख त्याचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करत असतो.
गौरीची आहे एक तक्रार
पण शाहरुखची पत्नी गौरी खान हिला मात्र त्याच्याबद्दल एक तक्रार आहे. शाहरुख नेहमी कामातच गुंतलेला असतो, अशी गौरीची तक्रार आहे. पण तो असं का करतो,याची कदाचित तिला कल्पना नसेल. केवळ अभिनयाच्या जोरावरच मी स्वत:ला सांभाळलंय, असं शाहरुखचं म्हणणं आहे. तंयांच्यासाठी अभिनय किती महत्त्वाचा आहे हे लोकांना कदाचित माहीत नसेल. पैसा मिळवणे, कोणताही पुरस्कार जिंकणे किंवा प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा चित्रपट बनवणे हेच शाहरुखसाठी खूप महत्त्वाचे आहे. आई-वडिलांना गमावल्याचं जे दु:ख त्याच्या आत भरलं आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी काम करणं, अभिनय करणं हा एकच पर्याय तो अवलंबतो. म्हणूनच तो सतत कामात गुंतलेला असतो.