शाहरुखच्या चाहत्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, ‘मन्नत’ बाहेरील गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने कारवाई

| Updated on: Nov 03, 2023 | 10:06 AM

दरवर्षी प्रमाणेच, अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी शाहरुखच्या वांद्रे येथील 'मन्नत' या बंगल्याबाहेर त्याच्या चाहत्यांची झुंबड जमली होती. . पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

शाहरुखच्या चाहत्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, मन्नत बाहेरील गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने कारवाई
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (  Shah rukh khan) याने गुरुवारी (२ नोव्हेंबर) आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षी प्रमाणेच, अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी शाहरुखच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर त्याच्या चाहत्यांची झुंबड जमली होती. यासाठी त्याच्या निवासस्थानाबाहेरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक फोटो आणि व्हिडिओ द्वारेही विविध शहरातील चाहत्यांनी शाहरुखला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या.

मात्र त्यातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये पोलिस चाहत्यांवर लाठीचार्ज करताना दिसत आहे. सेलिब्रिटी पापाराझी व्हायरल भयानी याने शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासूनच चाहत्यांची ‘मन्नत’ बाहेर गर्दी उसळली. दिवसभर त्याच्या घराबाहेर बरीच गर्दी होती. मात्र ही गर्दी एवढी नियंत्रणाबाहेर गेली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याचे समोर आले आहे.

शाहरुखने स्वीकारल्या चाहत्यांच्या शुभेच्छा

शहरातील एका कार्यक्रमात त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी शाहरुख ‘मन्नत’ मधून बाहेर पडला. त्याची आलिशान कार बंगल्यातून बाहेर येताच काही वेळातच त्याच्या चाहत्यांनी कारभोवती गराडा घातला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत जमावाला पांगवले, त्यावेळी त्यांना लाठीचार्ज करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री देशभरातून हजारो चाहते शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी ‘मन्नत’ बाहेर आले. मध्यरात्री शाहरुखने शेकडो चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले, आणि त्याची सिग्नेचर पोझही दिली. शाहरुख त्याच्या बंगल्याच्या बाल्कनीत उभा होता. त्याने कॅमोफ्लाज पॅन्टसह काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. शाहरुखने काळी टोपी आणि सनग्लास घालत त्याचा लूक पूर्ण केला.


सोशल मीडियावरही मानले आभार

चाहत्यांना भेटल्यानंतर, शाहरुखने सोशल मीडियावरही चाहत्यांचे आभार मानत प्रेम व्यक्त केले. त्याने X (पूर्वीचे ट्विटर) वर भावना व्यक्त केल्या. ” तुमच्यापैकी बरेच लोक रात्री उशिरा येतात आणि मला शुभेच्छा देतात. मी फक्त एक अभिनेता आहे. मला तुमचं थोडं मनोरंजन करता येतं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी तुमच्या प्रेमाच्या स्वप्नात जगतो. मला तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.” अशा शब्दांत त्याने सर्वांचे आभार मानले.

 

डंकीचा टीझर रिलीज

दरम्यान शाहरुखने वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली. ‘डंकी’ या त्याच्या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर काल रिलीज झाला. ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार असून त्यामध्ये शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल यांचीही महत्वाची भूमिका आहे.