नवऱ्यामुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार ? ईडीकडून समन्स मिळण्याची शक्यता
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) कायदा 2002 अंतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे. शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेत जुहू येथील फ्लॅट, पुण्यातील एक बंगला आणि राज कुंद्राच्या नावे अनेक इक्विटी शेअर्सचाही समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता.
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची एकूण 97 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केल्यानंतर बॉलिवूड हादरलं. जप्त केलेल्या या मालमत्तेत शिल्पाच्या नावावर असलेल्या जुहू येथील फ्लॅटचाही समावेश आहे. मात्र आता या प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7000 कोटी रुपयांहून अधिक गेन बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडी लवकरच शिल्पा शेट्टीला समन्स पाठवू शकते. तिचा जबाब नोंदवण्यासाठी ईडीकडून हा समन्स बजावण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमारे 150 कोटी रुपयांच्या 285 बिटकॉइन्सच्या गुन्हेगारी कमाईचा काही भाग शिल्पा शेट्टीपर्यंत पोहोचला असावा, असा संशय आहे.
दरम्यान, गुरूवारी दुपारी ईडीच्या मुंबई झोन कार्यालयाने शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली. गेन बिटकॉइन पॉन्झी घोटाळा प्रकरणातराज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या मालकीच्या 97.79 कोटी रुपयांचा समावेश आहे. ईडीने त्यांचा जुहू येथील फ्लॅटचा, पुण्यातील बंगला आणि अेक इक्विटी शेअर्स जप्त केले.
मेसर्स व्हेरिएबल टेक पीटीई लिमिटेड, दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि अनेक एमएलएम एजंट्सविरुद्ध महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात 10 टक्के परतावा दर महिन्याला देण्याचे अमिष दाखवून मोठा बिटकॉइन घोटाळा केल्याचा आरोप राज कुंद्रावर लावण्यात आला आहे. बिटकॉइन प्रकरणात फायदा करवून घेऊन राज कुंद्रा सध्याच्या घडीला 150 कोटींच्या फायद्यात असल्याचेही ईडीचे म्हणणे आहे.
राज कुंद्रा यांनी युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म सुरू करण्यासाठी गेन बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याचा मास्टरमाईंड आणि प्रवर्तक अमित भारद्वाजकडून 285 बिटकॉइन्स घेतल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. राज कुंद्रा याच्याकडे 285 बिटकॉइन्स आहेत, ज्याची किंमत सध्या 150 कोटींहून अधिक आहे. या प्रकरणी यापूर्वी अनेक शोधमोहीम राबवून 3 जणांना अटक करण्यात आली होती. 17 डिसेंबर 2023 रोजी सिम्पी भारद्वाज, 29 डिसेंबर 2023 रोजी नितीन गौर आणि त्याआधी 16 जानेवारीला रोजी निखिल महाजनला अटक करण्यात आली होती. हे सर्वजण आजपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य आरोपी अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज अद्याप फरार आहेत. यापूर्वी ईडीने 69 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.