Sunidhi Chauhan : गायिका सुनिधी चौहानविरोधात शिवसेनेच्या वाहतूक शाखेची तक्रार, कार्यक्रम पाकिस्तानमधून स्पॉन्सर असल्याचा आरोप
सुनिधी चव्हाणचा हा कार्यक्रम मुंबईत तसेच देशात कुठेही होऊ नये. यासाठी शिवसेनेचा विरोध असेल अशी ठाम भूमिका शिव वाहतूक सेना कार्यकारी प्रमुख गफ्फार शेख यांनी मांडली आहे आणि त्यांनी तशी तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
मुंबई : बॉलीवूड मधील गायिका (Bollywood Singer) सुनिधी चव्हाण (Sunidhi Chauhan) आपल्या अनेक सुपरहिट गाण्यांसाठी प्रसिद्ध (Bollywood Songs) आहे. मात्र आता ती एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. सुनिधी चव्हाण विरोधात शिवसेनेचे काही कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत सुनिधी चव्हाण विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली, ती तक्रार उशिरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांकडून देण्यात आलीय. सुनिधी चव्हाणचा एक कार्यक्रम पाकिस्तान स्पॉन्सर असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वाहतूक शाखेने या कार्यक्रमाला विरोध केला आहे. 13 ऑगस्टला म्हणजे शनिवारी सुनिधी चव्हाणचा हा लाईव्ह कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले, सुनिधी चव्हाणचा हा कार्यक्रम मुंबईत तसेच देशात कुठेही होऊ नये. यासाठी शिवसेनेचा विरोध असेल अशी ठाम भूमिका शिव वाहतूक सेना कार्यकारी प्रमुख गफ्फार शेख यांनी मांडली आहे आणि त्यांनी तशी तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
पाकिस्तानातून फंडिंग होत असल्याचा आरोप
याबाबत बोलताना शेक म्हणाले, त्यांनी पाकिस्तानद्वारा स्पॉन्सर प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याला आमचा कडाडून विरोध आहे. कारण पाकिस्तान एक असा देश आहे. जो कायम भारत विरोधी आहे. जेवढ्या या ठिकाणी दंगली झाल्या, जेवढे बॉम्बस्फोट झाले या सगळ्यात पाकिस्तानचा हात होता. सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आपल्या देशातील जवान जे बॉर्डरवरती लढतात. त्यातील काही जवान मागील काळात शहीद झाले, त्यामुळे आमचा पाकिस्तानला कडाडून विरोध आहे. सुनिधी चव्हाण या पाकिस्तानची फंडिंग घेऊन भारतात शो करत आहे, असे म्हणत त्यांनी या कार्यक्रमाचे पॅम्प्लेटही दाखवलेले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंचाही नेहमीच विरोध राहिला
जसे की शिवसेनेने अगोदरही पाकिस्तानचा विरोध केला होता, जे बाळासाहेब ठाकरे यांचा पाकिस्तान विरोधातलं धोरण होतं, तेच शिवसेना अजूनही कायम घेऊन चालत आहे. आम्ही ओशिवारा पोलीस ठाण्यात येण्याचं कारण हे आहे की सुनिधी चव्हाण अंधेरीत राहतात. त्यामुळे स्थानिक पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे, आमच्या पूर्ण वाहतूक सेनेचा या कार्यक्रमाला विरोध असेल, पोलिसांनी त्यांना बोलवून घेऊन समज दिली जाईल, असे आश्वासन आम्हाला दिले आहे. तसेच ज्या चॅनल वरती हा प्रोग्राम लाईव्ह येणार आहे, त्यांनाही आम्ही मेल करणार आहोत की हा प्रोग्राम दाखवू नये, दाखवल्यास शिवसेना यालाही कडाडून विरोध करेल, असा थेट इशारा यावेळी शिवसेनेच्या शेख यांनी दिला आहे.