कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला आहे. या शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी कपिल शर्मासोबत विविध मुद्द्यांवरून गप्पा मारल्या. या गप्पांदरम्यान कपिलने स्टेडियमवर मुलींकडून मिळणाऱ्या पाठिंब्याचाही विषय छेडला. चौकार किंवा षटकार मारल्यानंतर अनेकदा स्टेडियमवरील कॅमेरे हे चाहत्यांच्या प्रतिक्रिया टिपण्यासाठी स्टँडकडे वळतात. अशावेळी जेव्हा एखादी सुंदर मुलगी स्टेडियमवर दिसते, तेव्हा काय गंमत होते, याविषयी श्रेयसने कपिलला सांगितलं.
कपिल श्रेयसला मस्करीत विचारतो, “जेव्हा तू षटकार मारतोस, तेव्हा कॅमेरात अनेक मुलींच्या प्रतिक्रिया टिपल्या जातात. यात एखादीच्या हातात, ‘श्रेयस माझ्याशी लग्न कर’ असं लिहिलेलं पोस्टरसुद्धा असतं. तेव्हा तू मॅच संपल्यावर त्या मुलीबद्दल चौकशी करतोस का? ती कुठे बसली आहे याविषयी तू कॅमेरामनला विचारतोस का?” त्यावर उत्तर देताना श्रेयस आयपीएलमधील एक किस्सा सांगतो. “मी पहिल्या वर्षी जेव्हा आयपीएल खेळत होतो, तेव्हा स्टँडमध्ये एका सुंदर मुलीला बसल्याचं पाहिलं होतं. मी तिला हात दाखवून हॅलोसुद्धा म्हणालो होतो. हे खूप वर्षांपूर्वी घडलं होतं. मॅच संपल्यानंतर ती मला फेसबुकवर मेसेज करेल याची मी वाट पाहत होतो. त्यासाठी मी सतत माझा इनबॉक्ससुद्धा तपासत होतो. माझ्यासोबत ही एकच घटना घडली”, असं श्रेयस सांगतो.
या एपिसोडमध्ये रोहित शर्मा ‘वर्ल्ड कप 2023’मधील भारतीय संघाच्या पराभवाविषयीही व्यक्त झाला. तो म्हणाला, “जेव्हा सामना सुरू झाला, तेव्हा आम्ही सुरुवात चांगली केली होती. शुभमन गिल लगेच बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि माझी पार्टनरशिप सुरू होती. आम्हाला विश्वास होता की आम्ही चांगला स्कोअर करू शकू. मला असं वाटतं की मोठ्या मॅचेसमध्ये तुम्ही चांगला स्कोअर करून समोरच्या टीमवर दबाव आणू शकता. कारण त्या टीमला त्या धावा पूर्ण करायच्या असतात. पण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खूप चांगले खेळले. आम्ही अवघ्या 40 धावांत तीन विकेट्ससुद्धा घेतले होते. पण त्यांची पार्टनरशिप खूप वेळ चालली.”
“वर्ल्ड कप आपल्या देशात पार पडला आणि तरी आपण जिंकू शकलो नाही याचा मी खूप विचार केला. देशातील चाहते आमच्यावर रागावले असतील, असं मला वाटलं होतं. पण लोकांनी आमच्या खेळीचंही कौतुक केलं”, असं तो पुढे म्हणाला. या एपिसोडमध्ये रोहित शर्माने आणखी एक मजेशीर खुलासा केला. शिखर धवन आणि ऋषभ पंत यांच्यासोबत कधीच रुम शेअर करत नसल्याचं त्याने सांगितलं. यामागचं कारणसुद्धा त्याने कपिलला सांगितलं.