मुंबई : अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांतून अभिनेता सूरज पांचोलीची विशेष सीबीआय न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने जियाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. यासाठी सूरजला जबाबदार धरता येणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यानंतर आता सूरजची आई जरीना वहाब यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जिया खानने 2013 मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर सूरजवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच आरोप लावण्यात आला होता.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत जरीना यांना सांगितलं की तब्बल 10 वर्षांनंतर त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू आलंय. आता कुठे आमचं कुटुंब एक सर्वसामान्य कुटुंबासारखं राहू शकतंय, असं त्या म्हणाल्या. “अखेर आम्हाला न्याय मिळेल याच विश्वासावर आम्ही गेली दहा वर्षे काढली. अखेर आम्हाला तो न्याय मिळाला. पण मग अशा इतर आईंचं काय, ज्यांची मुलं एका अपयशी नात्यानंतर तुरुंगात डांबली गेली आहेत? मला त्यांच्यासाठी वाईट वाटतं. ज्या त्रासातून मी गेले, त्या त्रासातून कोणतीच आई जाऊ नये”, अशी प्रतिक्रिया झरीना यांनी दिली.
“माझ्या मुलाने असं काय चुकीचं केलं होतं, ज्यामुळे त्याला 10 वर्षांपर्यंत शिक्षा दिली गेली? आता आम्हाला फक्त सर्वसामान्य कुटुंबासारखं राहायचंय. जेव्हा मुलगा चुकीच्या आरोपांखाली शिक्षा भोगत असतो, तेव्हा त्याचं कुटुंब कसं सुखाने जगू शकतं”, असा सवाल त्यांनी केला.
जिया खानची आत्महत्या ही घटना दुर्दैवी आहे. परंतु खटल्यादरम्यान पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांमधून असं दिसून येतंय की सूरजसोबतच्या त्रासदायक रिलेशनशिपमधून जिया कधीही बाहेर पडू शकली असती. मात्र तिला तसं करता आलं नाही आणि ती तिच्याच भावनांना बळी पडली. तिच्या या वर्तनासाठी सूरजला जबाबदार धरता येणार नाही, असं विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी स्पष्ट केलं.
सूरजने जियाला नैराश्यातून बाहेर येण्यास याआधीही मदत केली होती. मात्र घटनेच्या वेळी तो त्याच्या अभिनय कारकिर्दीत व्यग्र होता आणि तिला वेळ देऊ शकत नव्हता. सूरजने ही बाब खटल्यादरम्यान कबूल केल्याचंही न्यायालायने आदेशात म्हटलं आहे.