मुंबई: अभिनेते किरण माने (kiran mane) यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांना मालिकेतून काढणं हे प्रकरण सतत नवं वळण घेतंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Commission president Rupali Chakankar) यांनी आता या प्रकरणात एन्ट्री घेतली आहे. किरण माने यांच्या पत्नी ललीता माने ( lalita mane) यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहून किरण माने यांना मालिकेतून का काढलं, याचा जाब विचारला आहे. ‘या सगळ्या प्रकाराचं स्पष्टीकरण द्या’, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.
महिला आयोगाच्या पत्रात काय आहे?
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पॅनोरामा इंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेच्या पदाधिकारी सुझाना घई यांना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांच्या तक्रारीचा उल्लेख केला आहे. पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, ‘किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांनी आपल्याला या सगळ्या प्रकाराचा मानसिक त्रास होत असल्याचं म्हटलंय. सोबतच, आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागत असल्याचं म्हटलंय. या सगळ्याची दखल घेत या निर्मिती संस्थेने किरण माने यांना मालिकेतून का काढलं याचं स्पष्टीकरण द्यावं’, असं पत्र रुपाली चाकणकर यांनी लिहिलंय. कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्यामुळे याबाबतीतचा लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना देण्यात आलेले आहेत.
स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विविध माध्यमांवर आपल्या वैचारिक भूमिका मांडतात या कारणामुळे या मालिकेतून काढून टाकलं असून मालिका निर्मात्याच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे यासोबतच कुटुंब आर्थिक संकटात सापडून मानसिक तणावात आहे असे किरण माने यांच्या पत्नी यांनी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, असंही या पत्रात म्हटलं गेलं आहे.
नेमका वाद काय आहे?
स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. त्यानंतर काही दिवसात किरण माने यांना त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. आपण ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं गेलं, असा आरोप किरण माने यांनी केला. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
संबंधित बातम्या