मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली. सुनील शेट्टीने केवळ हिंदीतच नाही तर मराठी, दाक्षिणात्य आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. वयाची साठी ओलांडल्यानंतरही सुनील शेट्टी आपल्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डमधून कॉल्स यायचे, असा धक्कादायक खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला. अशावेळी ते काय करायचे आणि अंडरवर्ल्डची समस्या त्यांनी कशा पद्धतीने मार्गी लावली, याविषयीही ते मोकळेपणे व्यक्त झाले.
‘द बार्बरशॉप विथ शांतनू’ या पॉडकास्टमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. ते म्हणाले, “ही त्यावेळची गोष्ट आहे, जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डचा खूप बोलबोला होता. मी तुझ्यासोबत असं करेन, तसं करेन अशा धमक्या देणारे बरेच फोन कॉल्स मला यायचे. मी त्यांना उलट उत्तर द्यायचो. मला पोलीस म्हणायचे की, ‘तू वेडा आहेस का? तुला समजत नाही. जर ते नाराज झाले तर ते काहीही करू शकतात.’ त्यावर मी पोलिसांना म्हणायचो की, इथे मी चुकीचा नाही. तुम्ही मला सुरक्षा द्या. मी काय चुकीचं केलं? अशा बॅकग्राऊंडमधून मी पुढे आलोय.”
“या धमक्यांबद्दल मी कधीच अथिया किंवा अहानला बोललो नाही. अंडरवर्ल्डच्या फोन कॉल्सना मी कशा पद्धतीने उत्तर द्यायचो हे सुद्धा मी त्यांना सांगितलं नाही. मी अशा काही वेड्यासारख्या गोष्टी केल्या आहेत. त्या गोष्टींमुळे मला ठेचही पोहोचली आणि मी स्वत: त्यातून बाहेर पडलो. म्हणूनच मी नेहमी सांगतो की वेळ हा सर्वोत्तम उपाय असतो. वेळेनुसार प्रत्येक गोष्ट सुधारली जाऊ शकते”, असंही ते पुढे म्हणाले.
सुनील शेट्टी यांनी या मुलाखतीत लहानपणीच्या आठवणीसुद्धा सांगितल्या आहेत. “मी लहानपणी नेपेन्सी रोडला राहायचो. तो कुख्यात परिसर होता असं मी म्हणणार नाही. पण गँग्स आणि इतर अशा अनेक गोष्टी तिथे घडायच्या. तिथूनच लॅमिंग्टन रोडवर मुंबईतील पहिली गोल्डन गँग उदयास आली. व्यवसायासाठी ती खूप चांगली जागा असली तरी आम्ही तिथे लहानाचे मोठे व्हावेत, अशी वडिलांची अजिबात इच्छा नव्हती”, असं त्यांनी सांगितलं.
सुनील शेट्टी हे नुकतेच ‘हंटर तुटेगा नहीं तोडेगा’ आणि ‘धारावी बँक’ या वेब शोजमध्ये झळकले होते. त्यांची मुलगी अथिया शेट्टीने या वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेटर केएल राहुलशी लग्नगाठ बांधली.