अभिनेता गोविंदा जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावत होता, तेव्हा त्याने गर्लफ्रेंड सुनिता अहुजाशी लग्न केलं. किंबहुना गोविंदा आणि सुनिता यांनी गुपचूप लग्न केलं होतं. बाळ होईपर्यंत त्यांच्या लग्नाविषयी कोणालाच कानोकान खबर नव्हती. आता लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा आणि सुनिताच्या संसारात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे दोघं घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. काही मुलाखतींमध्ये सुनिता अप्रत्यक्षपणे गोविंदासोबतच्या नात्यातील नाराजी बोलून दाखवली होती. इतकंच काय तर पुढच्या जन्मी असा नवरा नको, असं तिने थेट म्हटलं होतं.
‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुनिता म्हणाली, “प्रेम आंधळं असतं, पण आता डोळे उघडतायत. आम्ही दोन घरं आहेत. आमच्या अपार्टमेंटसमोर एक बंगला आहे. माझ्या फ्लॅटमध्ये मी मुलांसोबत राहते, तर समोरच्या बंगल्यात गोविंदा राहतो. त्याची रात्री उशिरापर्यंत मिटींग्स असतात. त्याला सतत अवतीभवती दहा माणसं गप्पा मारण्यासाठी हवे असतात. मला घरात शांती हवी असते.”
याच मुलाखतीत सुनिताने पुढच्या जन्मी गोविंदासारखा पती नको असं म्हटलं होतं. “मी त्याला सांगितलंय की पुढच्या जन्मी तू माझा पती बनू नकोस. तो सुट्ट्यांवर जात नाही. मी अशी व्यक्ती आहे जिला पतीसोबत फिरायला, त्याच्यासोबत रस्त्यावर पाणीपुरी खायला आवडतं. पण तो कामातच खूप व्यग्र असतो. मला असा एकही दिवस आठवत नाही, जेव्हा आम्ही दोघं एखादा चित्रपट बघायला गेलो”, अशी तक्रार तिने बोलून दाखवली होती.
सुनिता आणि गोविंदा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी खूप वेगवेगळी आहे. विविध मुलाखतींमध्ये तिने सांगितलंय की सुनिता त्यावेळी वांद्र्याला राहायची आणि तो विरारला राहायचा. सुनिताच्या वडिलांना गोविंदासोबतचं तिचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे ते मुलीच्या लग्नाला उपस्थित नव्हते. लग्नानंतरही गोविंदा दिवसातून पाच शिफ्टमध्ये काम करायचा. मुलीच्या जन्माच्या वेळीही तो पत्नीसोबत नव्हता.
ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सुनिताने काही महिन्यांपूर्वी गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. याविषयी गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने माहिती दिली. “कुटुंबातील काही सदस्यांच्या वक्तव्यांमुळे गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्यात समस्या सुरू आहेत. याशिवाय त्या दोघांमध्ये आणखी काही झालेलं नाही. गोविंदा त्याच्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. विविध कलाकार आमच्या ऑफिसमध्ये येत आहेत. सुनितासोबतच्या समस्या सोडवण्याचा तो प्रयत्न करत आहे”, असं मॅनेजरने म्हटलंय.