Sushant Singh Rajput Case | सुशांत प्रकरणी ‘राबता’ दिग्दर्शकाच्या घर आणि कार्यालयावर ईडीचा छापा!
ईडीने सुशांत प्रकरणाच्या तपासादरम्यान आज चित्रपट दिग्दर्शक दिनेश विजानच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात, त्याच्या कुटुंबियांनी पैशांच्या गैरव्यवहाराची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे अंमलबजावणी संचालानलयाने अर्थात ईडीने याप्रकरणी तपास सुरू केला होता. ईडीने सुशांत प्रकरणाच्या तपासादरम्यान आज (14 ऑक्टोबर) चित्रपट दिग्दर्शक-निर्माता दिनेश विजान (Dinesh Vijan) यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा (ED Raid) टाकला आहे. ईडीकडून 15 सप्टेंबर रोजी दिनेश विजान यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता दिनेशच्या घरी आणि कार्यालयात धाड टाकण्यात आली आहे. (Sushant singh Rajput case ED raid on dinesh vijan house and office)
सुशांत सिंह राजपूतने दिनेश विजानसह ‘राबता’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटादरम्यान त्यांच्यात पैशांच्या देवाण-घेवाणीवरून बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सुशांत दिनेशसह आणखी एका प्रोजेक्टवर काम करणार होता. मात्र, तो चित्रपट काही कारणास्तव रद्द केला गेला. मिळालेल्या माहितीनुसार ईडी अधिकाऱ्यांनी दिनेश विजानकडून (Dinesh Vijan) काही कागदपत्रे देखील ताब्यात घेतली आहेत.
सुशांतच्या खात्यातून पैशांचा गैरव्यवहार, कुटुंबियांचा दावा
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाने त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्याच बरोबर या प्रकारणात पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे देखील सुशांतच्या कुटुंबाने म्हटले होते. सुशांतच्या बँक खात्यातून तब्बल 15 कोटींची अफरातफर झाल्याचा दावा, त्याच्या वडिलांनी केला होता. या दाव्यामुळे सुशांत प्रकरणात ईडीनेदेखील चौकशी करण्यास सुरुवात केली होती.
ईडीने सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचीदेखील चौकशी केली होती. सुशांतचे वडील के.के.सिंह यांनी पटनामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यात त्यांनी रियाने सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला होता. मात्र, तपासादरम्यान असे कुठलेही व्यवहार ईडीच्या नजरेत आलेले नाहीत.( Sushant singh Rajput case ED raid on dinesh vijan house and office)
सुशांत प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण
सुशांतची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्याने, या तपासासाठी एम्सच्या डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. या पथकाने तपास केल्यानंतर सुशांतचा मृत्यू आत्महत्याच असल्याचे म्हणत, त्याच्या हत्येशी शक्यता फेटाळून लावली.
दुसरीकडे या घटनेशी संबंधित ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबी कडून तपास सुरू झाला. एनसीबीने धडक कारवाई करत, ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित सगळ्यांना चौकशीचे समन्स बजावले. यातील काही लोकांना अटकही करण्यात आली. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह अशी मोठी नावे यात समोर आली. या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्तीला अटक केली होती. तर, रियाला नुकताच जामीन मिळाल्याने ती सध्या तुरुंगाबाहेर आहे.
संबंधित बातम्या :
PHOTO : कधी झाला सुशांतचा मृत्यू आणि केव्हा केलं पोस्टमार्टम? रिपोर्टमधून सत्य समोर
Sushant case | सुशांतच्या घरी 13 जूनला कोणताही पार्टी नव्हती, शेजाऱ्यांच्या माहितीने ट्विस्ट
(Sushant singh Rajput case ED raid on dinesh vijan house and office)