इटली | 5 ऑक्टोबर 2023 : सार्डिनिया सुपरकार टूर या इटलीतल्या लक्झरी कार परेडला गालबोट लागलं. ही सुपरकार टूर स्विस दाम्पत्यासाठी प्राणघातक ठरली. या अपघातात दोन ते तीन महागड्या गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि त्यात दोन लोकांनी आपले प्राण गमावले. या अपघातात शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचाही समावेश होता. बुधवारी या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दोन ते तीन गाड्या एका कॅम्परवॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला आणि फरारी गाडीला आग लागली. या आगीमुळे फरारीतील दाम्पत्याचा मृत्यू झाला.
मागच्या गाडीच्या डॅशकॅममध्ये हा संपूर्ण अपघात रेकॉर्ड झाला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत दिसणाऱ्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीतून गायत्री आणि विकास प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात त्या दोघांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र रिपोर्ट्सनुसार, जर गायत्रीचा पती विकास याप्रकरणी दोषी आढळल्यास त्याला सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023
गायत्री जोशीचा पती विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रियॅल्टी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओबेरॉय रियॅल्टी लिमिटेडची स्थापना रणवीर ओबेरॉय यांनी तीन दशकांपूर्वी केली होती. प्रॉपर्टी व्यतिरिक्त विकास हे हाऊसिंग, कॉर्पोरेट, हॉस्पिटल आणि रिटेलमध्येही गुंतवणूक करतात. विकास ओबेरॉय हे मुंबईतील प्रसिद्ध वेस्टीन हॉटेलचे मालकसुद्धा आहेत.
गायत्रीने 2004 मध्ये आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांकडून विशेष कौतुक झालं होतं. गायत्रीच्या अभिनयाची त्यांनी प्रशंसा केली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला बरेच पुरस्कारदेखील मिळाले होते. मात्र त्यानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम केल्यानंतर गायत्रीने भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केलं.