मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. लहानांपासून वृद्धांपर्यंतच्या प्रेक्षकांना ही मालिका आवडते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आधी मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदौरियाने निर्मात्यांवर टीका केली. मोनिकानेही त्यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. निर्मात्यांनी पैसे दिले नाहीत आणि शूटिंगदरम्यान त्रास दिल्याचं तिने म्हटलंय. इतकंच नव्हे तर तिने दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीबाबतही मोठा खुलासा केला आहे.
दिशाने बाळंतपणासाठी मालिकेतून सुट्टी घेतली होती. मात्र त्यानंतर ती पुन्हा मालिकेत परतलीच नाही. दिशा ‘तारक मेहता..’मध्ये परत का येत नाहीये, याचं कारण मोनिकाने सांगितलं. त्याचप्रमाणे ती पुन्हा कधीच मालिकेत कमबॅक करणार नाही, असंही ती म्हणाली. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत मोनिका म्हणाली, “दिशाला परत यायचं नाहीये. कोणीच या मालिकेत परत येऊ इच्छित नाही. दिशा या मालिकेची मुख्य कलाकार होती. तिला परत आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. मात्र तिला मालिकेत परत यायचंच नाहीये.”
“असित मोदी यांनी दिशासोबतही गैरवर्तणूक केली. मात्र ती कधी त्याकडे गांभीर्याने पाहायची नाही. ती गोष्टींकडे दुर्लक्ष करायची. जाने दो, कोई बात नहीं, असं म्हणत ती टाळायची. मालिकेत जे लोक काम करत आहेत, ते काही बोलणार नाहीत. कारण मालिकेमुळे त्यांच्या घरात चूल पेटतेय. तरीसुद्धा भविष्यात आणखी काही कलाकार त्यातून बाहेर पडतील”, असं ती पुढे म्हणाली.
मोनिकाने 2019 मध्ये मालिका सोडली होती. मात्र मालिका सोडल्यानंतर तीन महिन्यांनीही त्यांनी थकलेलं मानधन दिलं नसल्याचा आरोप तिने केला आहे. “मी वर्षभरापेक्षा जास्त काळ माझ्या पैशांसाठी लढले. त्यांनी प्रत्येक कलाकाराचे पैसे रोखले आहेत. मग तो राज अनाडकत असो, गुरुचरण सिंग.. त्यांच्याकडे पैशांची कमी नाही. पण फक्त त्रास देण्यासाठी त्यांनी पैसे दिले नाहीत”, असं ती म्हणाली होती.
आईवर कॅन्सरचे उपचार सुरू असताना निर्मात्यांनी साथ न दिल्याची तक्रारही तिने केली आहे. “मी रात्रभर आईसोबत रुग्णालयात असायचे आणि ते पहाटे मला शूटिंगला बोलवायचे. माझी मानसिक स्थिती चांगली नाही असं म्हटल्यावरसुद्धा ते मला बळजबरीने शूटिंगला बोलवायचे. वाईट गोष्ट म्हणजे मी सेटवर फक्त बसून राहायचे, पण मला काहीच काम द्यायचे नाहीत”, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.